उत्तर पूर्व मुंबईचा तिढा अद्याप कायम; सोमय्यांकडून ‘मातोश्री’भेटीचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:45 AM2019-03-30T01:45:32+5:302019-03-30T01:45:52+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी आपली बारावी यादी जाहीर केली. यात माढा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली.

North East of Mumbai remains still; Trying to get 'Matoshree' visit from Somaiya | उत्तर पूर्व मुंबईचा तिढा अद्याप कायम; सोमय्यांकडून ‘मातोश्री’भेटीचे प्रयत्न सुरू

उत्तर पूर्व मुंबईचा तिढा अद्याप कायम; सोमय्यांकडून ‘मातोश्री’भेटीचे प्रयत्न सुरू

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी आपली बारावी यादी जाहीर केली. यात माढा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली. मात्र, उत्तर पूर्व मुंबईबाबत घोषणा झालेली नाही. किरीट सोमय्यांच्या उमेदवारीबाबतचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे समजते. दरम्यान, शिवसैनिकांचे मन वळविण्यासाठी सोमय्यांकडून ‘मातोश्री’भेटीचे प्रयत्न सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यास कोणताच प्रतिसाद दिलेला नाही.
उत्तर पूर्वेतून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या प्रयत्नशील आहेत. मात्र, पालिका निवडणुकीदरम्यान आपल्या वक्तव्यांनी सोमय्या यांनी शिवसैनिकांचा रोष ओढवून घेतला आहे. शिवाय, भाजपतही त्यांच्याबाबत नाराजीची भावना आहे. त्यामुळेच दिल्लीतून अद्याप सोमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याचे समजते. सोमय्या यांना पर्याय म्हणून विविध नावे समोर आली असली तरी ती चर्चेच्याच पातळीवर आहेत.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनोज कोटक, प्रवीण छेडा यांच्या जोडीलाच आता आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीस शिवसेनेच्या विरोधाबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, सोमय्या यांच्या उमेदवारीचे काय करायचे ते भाजपचे नेते बघतील. मात्र, सोमय्या यांनी जी काही विधाने केली होती, मर्यादा सोडून टीका केली, त्यामुळे शिवसैनिकांच्या भावनेचा उद्रेक झाला. आम्ही कसेबसे शिवसैनिकांना आवरले आहे, असे राऊत म्हणाले.

ईशान्य मुंबईची जागा आठवलेंसाठी सोडण्याची मागणी
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप यांचे एकमत होत नाही. या हा वाद बाजूला ठेवून ही जागा भारिपचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी भारिपच्या नेत्यांनी आज केली.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपने मन मोठे करून रिपब्लिकन पक्षासाठी सोडल्यास संपूर्ण देशभरात चांगला संदेश जाईल. ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही.
त्यामुळे या मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला आहे. अशावेळी ही जागा रामदास आठवले यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी भारिपचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी पत्रपरिषदेत केली. यानंतर नेमकी ही जागा कोणाला मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

Web Title: North East of Mumbai remains still; Trying to get 'Matoshree' visit from Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.