मुंबई: उत्तर भारतीय मुंबईचा कणा असल्याचं भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. उत्तर भारतीयांनी पुढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या समाजानं मुंबईच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्याही विकासात कायम मोलाचं योगदान दिलं आहे, असं महाजन म्हणाल्या. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उत्तर भारतीय समाजातील विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांनी उत्तर भारतीय समाजाचं तोंडभरुन कौतुक केलं. महाराष्ट्र आणि उत्तर भारताचं नातं खूप जुनं आहे. महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते, असं त्या म्हणाल्या. उत्तर भारत आणि महाराष्ट्राचा संबंध अगदी प्राचीन काळापासून आहे. उत्तर भारतीय समाज तुम्हाला फक्त मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या प्रगतीत या समाजाचं योगदान अतिशय मोठं आहे, असे कौतुकोद्गार महाजन यांनी काढले. या कार्यक्रमाला आमदार प्रकाश अळवणी, माजी नगरसेवक महेश पारकर, नितेश राजहंस सिंह, गुलाबचंद दुबे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
उत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 7:52 AM