मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून मोठं वादंग निर्माण झाले. उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत जोपर्यंत राज ठाकरे माफी मागणार नाहीत तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही असा इशारा दिला होता. राज ठाकरेंविरोधात बृजभूषण सिंह यांनी ठिकठिकाणी मेळावे, रॅली काढून मनसेला चिथावणी देणारी विधानं केली होती.
आता खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मुंबईत उत्तर भारतीय संघटनेने आंदोलन करत गेली १४ वर्ष कुठे झोपले होते? असा सवाल केला आहे. याबाबत गोविंद पांडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन त्यांनी राज ठाकरेंना विरोध करायला हवा होता. परंतु २००८ पासून तुम्ही कुठे होता? स्वत:च्या घरात बसून कुणीही धमक्या देऊ शकते. शरद पवारांचा हात बृजभूषण सिंह यांच्या डोक्यावर आहे. शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे संबंध आहेत. राज ठाकरेंना अडवण्यासाठी बृजभूषण सिंह यांचा ट्रॅप शरद पवारांनीच आखला होता असं त्यांनी सांगितले.
तसेच बृजभूषण सिंह हे जे काही उत्तर प्रदेशात करत आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले तर ते इथे येणार आहेत का? राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजपाने मध्यस्थी करायला हवी होती. ज्यादिवशी राज ठाकरे अयोध्येत जातील तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत तिथे जाऊ. त्यांचे अयोध्येत स्वागत करू. आम्हाला १४९ नोटीस दिली होती. ज्यादिवशी बृजभूषण सिंह मुंबईत येतील तेव्हा सर्वात आधी चपलांचा हार आम्ही घालू असा इशारा जीवनधारा फाऊंडेशनचे गोविंद पांडे यांनी दिला.
काय आहे प्रकरण?मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर ५ जून रोजी अयोध्येत जात प्रभू रामाचं दर्शन घेणार असल्याचं जाहीर केले होते. मात्र राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध करत त्यांच्याविरोधात रॅली, सभा आयोजन केले. राज ठाकरे माफी मागत नाहीत तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. इतकेच नाही तर राज ठाकरे उंदिर आहे. त्यांचा बापही अयोध्येत येऊ शकत नाही अशाप्रकारे चिथावणी देणारी विधानं बृजभूषण सातत्याने करत राहिले. मात्र अयोध्या दौऱ्याचा विरोध हा ठरवून केलेला ट्रॅप आहे. त्यात मनसे कार्यकर्त्यांना अडकवण्याचा डाव होता असं सांगत राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला.