मुंबई : काही वर्षापूर्वी मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना काहीजण धमकावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आम्ही सत्तेत आल्यानंतर गेल्या चार वर्षांत कुणाचीही उत्तर भारतीयांना धमकावण्याची हिंमत झाली नाही. कारण, उत्तर भारतीयांना जे धमकावत होते, त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
मुंबईतील वाकोल्याच्या लायन्स क्लबमध्ये गुरुवारी उत्तर भारतीयांच्या लोक महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांचे तोंडभरून कौतुक केले.
मागील अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेश दिवस महाराष्ट्रात साजरा होत आहे. मात्र, पहिल्यांदाच मुंबईतील या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले आहेत. पूर्ण देशात मराठी माणसाप्रमाणे उत्तर भारतीय देखील सापडतील. उत्तर भारतीयांना धमकावण्याचा काही जण प्रयत्न करत होते. परंतू गेल्या चार वर्षांत कुणाची या लोकांना धमकावण्याची हिंमत झालेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याचबरोबर, आज उत्तर भारतीय मुंबईत आले आहेत. महाराष्ट्राच्या विकासात उत्तर भारतीयांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. हे उत्तर भारतीय आता उत्तर प्रदेशचे राहिले नसून, ते आता मुंबईकर आणि महाराष्ट्रवासीय झाले आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांचे कौतुक केले.