मुंबई: कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने एकीकडे सगळी जनता त्रस्त असतांना महावितरणाने प्रचंड विजबिल देऊन जनतेला एक मोठा शॉक दिला आहे. कुठल्याही प्रकारची सवलत न देता आपण अव्वाच्या सव्वा वीजबिल दिलीत व जनतेचा मानसिक छळ केला. महाआघाडी सरकारने वीज बिलात सवलत देऊ असे आश्वासनही दिले होते. परंतू तोही शब्द फिरविला व जनतेचा विश्वासघात केला. आत्तातर सर्व सामान्य जनतेला ७५ लाख ग्राहकांना वसूली करीता नोटीसा देऊन एक प्रकारे पठाणी वसूलीच महाआघाडी सरकार करीत आहे असा आरोप भाजपाने यावेळी केला.
जनतेला जारी केलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात व सर्व सामान्य जनतेला छळणे बंद करावे यासाठी उत्तर मुंबई भाजपचे वतीने अदानी महावितरण कार्यालयाला आज उत्तर मुंबई भाजपाने टाळे ठोकले. यावेळी भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी आयोजित केलेल्या या मोर्चात मुंबई भाजपाचे प्रभारी व आमदार अतुल भातखळकर, आमदार भाई गिरकर, भाजप मुंबई उपाध्यक्ष व आमदार योगेश सागर, सरचिटणीस व आमदार सुनील राणे,मुंबई भाजपा चिटणीस विनोद शेलार, योगेश वर्मा, वरिष्ठ नेते आर यू सिंग, उत्तर मुंबई चे सर्व नगरसेवक व पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मोर्चा उत्तर मुंबई भाजपा कार्यालयातून निघून कांदिवली पश्चिम येथे पोचल्या नंतर अदानी वीज कंपनी चा गेट वर टाळ्यानाद करत आक्रोश व्यक्त केला.यावेळी जिलाध्यक्ष गणेश खणकर सह उत्तर मुबंईतील सर्व भाजपा आमदार , पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळने वीज कंपनी अधिकाऱ्याना निवेदन दिले.