मनोहर कुंभेजकर
मुंबई--आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज दुपारी 12.30 वाजता उत्तर मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आहेत. दादरच्या टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आज दि,30 व उद्या दि,31 रोजी मुंबईतील सर्व 6 लोकसभा मतदार संघातील असलेल्या 36 विधानसभा निहाय मतदार संघातील इच्छुक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती माणिकराव ठाकरे व हर्षवर्धन पाटील घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चा पराभव झाला होता.त्यामुळे निवडून येण्याची क्षमता आणि कडवी लढत देऊ शकतील असेच तगडे उमेदवार उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्ष देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील दहिसर, बोरिवली, मागाठाणे, चारकोप, कांदिवली पूर्व व मालाड या सहा विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवारांसमोर कडवी लढत देण्यासाठी काँग्रेसच्या तरुण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी लोकमतशी बोलतांना दिली.
दहिसर विधानसभा मतदार संघातून चौथी प्रसाद गुप्ता आणि किशोर सिंह यांच्यात चुरस आहे.अरुण सावंत, विकास पांडे, अझीझ शेख , शैलेंद्र सिंह ह्यांनी देखील येथून उमेदवारी मागितलेली आहे. चौथी प्रसाद गुप्ता हे युवक काँग्रेस पासून पक्षात कार्यरत आहेत. संजय निरुपम यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर अन्याय झाला होता. त्यांच्या वॉर्डातून दिवंगत राजेंद्रप्रसाद चौबे यांना आणि त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले होते. तर एकदा महिला वॉर्ड झाल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांना तिकीट देण्यात आले होते.मात्र या वेळी चौथी प्रसाद गुप्ता यांचे नाव आघाडीवर असून किशोर सिंह यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
बोरिवली विधानसभा विभागात माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि कुमार खिल्लारे यांनी उमेदवारी मागितलेली असून त्यांच्या ऐवजी नवीन उमेदवाराला संधी मिळू शकेल अशी चर्चा आहे. शिवा शेट्टी यांचे काम जरी चांगले असले तरी येथील मराठी लोकसंख्या पाहता शेट्टी यांचे नाव मागे पडेल असे समजते.तर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना निवडणूक सोपी होईल असा कोणताही उमेदवार काँग्रेस देणार नसल्याचे दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्याने नाव न देण्याचा अटीवर सांगितले.
मनसे काँग्रेस आघाडीत सामील झाल्यास मागाठाणे विधानसभा आघाडी मनसेसाठी ही जागा सोडण्याची शक्यता असून येथून नयन कदम यांचे नाव चर्चेत आहे. कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात देखील मुंबई महिला अजंठा यादव आणि राजेंद्र शिरसाट यांच्यात मोठी चुरस आहे.या विभागासाठी राजेन्द्र प्रताप पांडे, विरेंद्र सिंह,शिव सहाय सिंह , आनंद राय हे उमेदवारी साठी इच्छूक आहेत.
चारकोप विधानसभेतून फक्त कालू बुधेलीया यांचा एकमेव अर्ज आलेला असून त्यांचे तिकीट पक्के असल्याचे बोलले जाते. मालाड पश्चिम विधानसभेतून पक्षाला कोणताही अर्ज प्राप्त झालेला नव्हता. तेथील आमदार अस्लम शेख हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकमतने मालाडचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर?असे बातमी देऊन लोकमतची बातमी महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात व सोशल मीडियावर गाजली. त्यामुळे मालाडमधून काँग्रेसने अजून कोणतेही नाव जाहीर केलेले नाही.