Join us

शेवटी ही जागा उबाठानं काँग्रेसच्या माथी मारली अन्...; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 2:19 PM

Mumbai North Loksabha ELection - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पीयुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 

मुंबई - Devendra Fadnavis on Mahavikas Aghadi ( Marathi News ) उत्तर मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस आणि उबाठामध्ये पहले तुम पहले तुम सुरू होतं. ही जागा कुणीच घ्यायला तयार नव्हते. शेवटी उबाठाने ही जागा काँग्रेसच्या माथी मारली असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला. 

पीयुष गोयल यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कांदिवलीत आले होते, त्यावेळी फडणवीस म्हणाले की, उत्तर मुंबई हा महायुतीचा गड आहे. रामभाऊ, गोपाळ शेट्टी यांनी उत्तम काम केले. लोकप्रतिनिधी कसे असायला हवेत याचा वस्तूपाठ हे दाखवून दिला. आज टीम मोदींमधील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू, ज्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात कामगिरी करणारे मंत्री म्हणून नाव कमावलं, जे मुंबईचे सुपुत्र आहेत, वेगवेगळी खाती पाहिली त्यावर आपल्या कामाचा ठसा उमटवला ते पीयुष गोयल हे उत्तर मुंबईला उमेदवार म्हणून मिळाले. पीयुष गोयल यांच्या माध्यमातून आपल्या हक्काचा माणूस मोदींसोबत मिळणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आता काँग्रेसवाले उमेदवार शोधत फिरतायेत. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई मित्रपक्ष अशी मजबुती महायुती आपण तयार केलीय. मुंबईत ज्याप्रकारे आपल्या सरकारने गेल्या १० वर्षात विकास केला. २५ वर्ष उद्धव यांच्या अधिपत्याखाली मुंबई महापालिका होती. एक काम ज्याने मुंबईचा चेहरा बदलला, चित्र बदलला ते दाखवू शकतात का? मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचं काम गेल्या १० वर्षात आमच्या सरकारने केले. शहरात आधुनिक सोयी मिळाल्या पाहिजे, सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन झालं पाहिजे. त्यामुळे मेट्रोचं जाळं झालं, ३५० किमी मेट्रो सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणार आहे असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

दरम्यान, देशाची कमान मोदींच्या हाती गेली पाहिजे. काँग्रेस, उबाठा ज्याप्रकारे मोदींबाबत विधाने करतात, ते ऐकून आश्चर्य वाटतं. गेल्या १० वर्षात मोदींनी मजबूत भारत निर्माण केला. २५ कोटी जनतेला गरिबी रेषेवर आणण्याचं काम सरकारने केले. २० कोटी लोक कच्च्या घरात राहत होते, त्यांना पक्की घरे दिली. मजबूत भारत ज्या भारताकडे चीन, पाकिस्तानही वाकडी नजर ठेवू शकत नाही. मागील १० वर्ष ट्रेलर होता, पुढील ५ वर्षात देशातील युवा, महिला, विविध जातीतील लोक, शेतकरी यांच्या जीवनात परिवर्तन येणार आहे. भारत विकसित देशाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे भारताला कुणी मागे आणू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

ही निवडणूक सामान्य माणसाच्या विकासाची

ठाणे-बोरिवलीसारखा भूयारी मार्ग आपण तयार करणार आहोत. वेगवेगळे प्रकल्प आहेत. मुंबई बदलण्याचं काम आम्ही करतोय. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना तिथेच पुनर्वसन करण्यात येणार आहे. गरिब कल्याणाचा अजेंडा मोदींनी घेतला आहे. गरिबांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे हे मोदींचे स्वप्न आहे. मुंबईतील पश्चिम द्रूतगती महामार्गावर ६० टक्के वाहतूक कोंडी होते. त्यावरील वाहतूक विभाजित करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. ही निवडणूक सामान्य माणसाच्या विकासाची निवडणूक आहे. त्यामुळे उत्तर मुंबई पीयुष गोयल निवडून येतील परंतु त्यांना इथल्या मतदारांना रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे असं देवेंद्र फडणवीसांनी लोकांना आवाहन केले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तरउद्धव ठाकरेकाँग्रेस