उत्तर मुंबईला 'उत्तम मुंबई' बनवणार, महायुतीच जिंकणार; पीयूष गोयल यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 11:11 AM2024-11-13T11:11:46+5:302024-11-13T11:16:43+5:30
कांदिवली पश्चिमेकडील कमला विहार स्पोर्ट्स समोरील सप्ताह मैदान येथे महायुतीची महासभा आयोजित करण्यात आली होती.
मुंबई-
गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर मुंबईत सभा घेतली म्हणजे आता महायुतीचे सहाही उमेदवार विजयी होतील. देशाच्या जडणघडणीत अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोलाचे योगदान आहे. या योगदानाचा विसर मुंबईकरांना पडणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
कांदिवली पश्चिमेकडील कमला विहार स्पोर्ट्स समोरील सप्ताह मैदान येथे महायुतीची महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गोयल बोलत होते. महासभेला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. "भारताचे स्वप्न साकार करणारे, ज्यांनी काश्मीरला भारतासोबत जोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' चे शिल्पकार देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे उत्तर मुंबईत मनापासून स्वागत करतो. गरिबांचे कल्याण, मध्यम वर्गासाठी एक उज्ज्वल भविष्य, तरुण - तरुणींना शिक्षण व रोजगारात संधी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव व वाढते उत्पन्न, महिलांना आत्म - सन्मानाने व स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी अनेक योजना सुरू केल्या. तसेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. पण देशाच्या सुरक्षेसाठी मोदींनी मोठी पावले उचलली. पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या प्रयत्नाने व अथक परिश्रमाने देश मजबूत झाला आहे", असे पीयूष गोयल म्हणाले.
उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवणार
"आता आम्ही 'उत्तर मुंबईला, उत्तम मुंबई' बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. वाढवण बंदर, दिघी इंडस्ट्रियल सिटी, एक्वा लाईन मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यांसारखे प्रकल्प उभारून महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला आहे. महाराष्ट्रामध्ये एक मजबूत सरकार येणार आणि विकासाला गती मिळेल", असेही पीयूष गोयल म्हणाले.
केंद्राच्या निर्णयांचे केले कौतुक
पीयूष गोयल म्हणाले, "५०० वर्षापासून देशवासीयांच्या मनात इच्छा होती की, प्रभू श्री रामाच्या जन्मभूमीत मंदिर व्हावे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली एक भव्य राम मंदिर अयोध्यामध्ये बनले आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग व्हावा. यासाठी ७५ वर्षापासून लोक संघर्ष करत आहेत आणि आपल्या जीवनाचे बलिदान देत आहेत. अमित शाह यांनी आर्टिकल ३७० आणि ३५ए हटवून काश्मीरला देशांमध्ये समाविष्ट केले. काश्मीरच्या जनतेला सेवा सुविधांचा लाभ मिळू लागला"