Join us

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ: शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये सामना?

By दीपक भातुसे | Published: June 16, 2023 7:50 AM

अटीतटीच्या लढतीची चिन्हे

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना आतापर्यंत रंगत आला आहे. यावेळी मात्र येथे कशी लढत असेल, याचे चित्र अस्पष्ट असले तरी शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर २०१९ मध्ये येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. येथील विद्यमान खासदार जरी शिंदे गटात असले तरी मतदार संघातील राजकीय गणिते लक्षात घेतली तर शिंदे गटाकडे हा मतदारसंघ जाण्याची शक्यता कमीच असून, तो भाजपच्या वाट्याला येईल, असे चित्र सध्या इथे आहे.

विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर ८० वर्षांचे असून, वयोमानामुळे ते पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे कीर्तिकर शिंदे गटात असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवाराअभावी हा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत आतापर्यंत काँग्रेस या मतदार संघातून निवडणूक लढवत आली असली तरी यावेळी महाविकास आघाडी झाली तर उद्धव ठाकरे गटाकडून या जागेवर दावा सांगितला जाणार आहे. कारण या मतदारसंघात काँग्रेसपेक्षा शिवसेना ठाकरे गटाची ताकद जास्त आहे. त्या दृष्टीने ठाकरे गटाने या मतदारसंघात निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे.

गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरेंबरोबरच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांनाच निवडणुकीत उतरवले जाईल, असे संकेत मिळत आहेत. अमोल निवडणुकीत उभे राहिले तर त्यांचे वडील गजानन कीर्तीकर शिंदे गटात असूनही छुप्या पद्धतीने ठाकरे गटाला मदत करू शकतील, असे बोलले जात आहे.

भाजपकडून या मतदारसंघात आमदार अमित साटम यांची लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने इथे निवडणुकीची जोरदार तयारीही सुरू केले आहे. नुकताच या मतदारसंघात भाजपचा मेळावा पार पडला. तसेच येथील बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांच्या नियुक्त्या पक्षाने केल्या आहेत. भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी या मतदारसंघात नुकतीच एक बैठकही घेतली होती.

कसे आहे बलाबल?

विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहिली तर येथे जोगेश्वरी पूर्व : रवींद्र वायकर, दिंडोशी : सुनील प्रभू, अंधेरी पूर्व : ऋतुजा लटके हे तीन मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे, तर गोरेगाव : विद्या ठाकूर, वर्सोवा : भारती लवेकर, अंधेरी पश्चिम : अमित साटम हे तीन मतदारसंघ भाजपकडे आहेत. शिंदे गटाकडे खासदार वगळता येथील एकही आमदार गेलेला नाही. दुसरीकडे येथे काँग्रेसकडे विधानसभेचा एकही मतदारसंघ नाही.

भाजपकडून कोण?

गोरेगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या विद्या ठाकूर यांचे पती आणि भाजपचे नेते जयप्रकाश ठाकूर यांची लोकसभेसाठी उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे. ठाकूर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असून गुजराती, मारवाडी मतदारांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. दुसरीकडे अमोल कीर्तीकर ठाकरे गटाकडून उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर तरुण उमेदवार म्हणून अमित साटम यांना उभे केले जाईल, अशीही चर्चा आहे.

ही जागा युतीत कोणाकडे जाईल हे माहीत नाही. पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील. ते ज्या पक्षाचा, जो उमेदवार देतील त्याला निवडून देण्याचे काम आम्ही करू. शेवटी निवडून आलेला उमेदवार संसदेत नरेंद्र मोदींसाठी उभा राहणार आहे. - अमित साटम, उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रमुख, भाजप

टॅग्स :मुंबईअमित साटम