मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचं सरकार स्थापन झाले. सत्ता पालटल्यानंतर भाजपानं सातत्याने उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. आता भाजपा आमदार अमित साटम यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंचे नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला आहे. आता आम्हाला खऱ्या अर्थाने बालक मंत्री नव्हे तर पालकमंत्री मिळालेत असं सांगत साटम यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं कौतुक केले आहे.
अमित साटम यांनी ट्विट करत म्हटलंय की, गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच पालकमंत्री कसं काम करतात याचा अनुभव घेत आहे. मंगलप्रभात लोढा प्रत्यक्षपणे जमिनीवर उतरून काम करत आहेत. कसल्याही प्रसिद्धीशिवाय आणि रिकामे ग्यान देण्याशिवाय कामावर फोकस ठेवत आहेत. म्हणूनच आत्ता आम्हाला ‘ बालक’ मंत्री नाही तर खरे पालकमंत्री मिळाले आहेत असं सांगत साटम यांनी अप्रत्यक्षपणे पूर्वीचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला. त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
नुकतेच मंत्रालयात अंधेरीतील गोखले उड्डाणपूल संदर्भात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गोखले उड्डाणपूल लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली होती. या बैठकीला आमदार अमित साटम, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री लोढा म्हणाले की, गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम ३ ते ४ महिन्यांत रेल्वेकडून करण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पुलाच्या प्री कास्टिंगचे काम याचदरम्यान सुरू राहिलं. मे २०२३ अखेरपर्यंत गोखले पुलाची किमान १ लाईन सुरू करण्याचा आमचा मानस आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे. या पुलासंदर्भात रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा व गोखले पुल देखील पूर्ण व्हावा, याकरिता प्रयत्न केले जात आहेत असेही पालकमंत्री लोढा यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"