स्वयंरोजगाराची संधी असताना एकही अर्ज नाही! दिव्यांग योजनेसाठी १० कोटी १७ लाख खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:32 AM2023-12-18T10:32:52+5:302023-12-18T10:33:01+5:30
स्वयंरोजगारांसाठी दिव्यांगांना संगणक, प्रिंटर व स्कॅनर देण्यात येणार आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी पालिका प्रत्येकी ७८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिव्यांगांना स्वयंरोजगाराची संधी मुंबई महापालिका उपलब्ध करून देत असली तरी २०२२-२३ या वर्षात कोणीही स्वयंरोजगारासाठी अर्ज केला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे २०२३-२४ या वर्षात ही योजना १ हजार ३०० दिव्यांगांकरिता राबवण्यात येणार आहे. योजनेसाठी सुमारे १० कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
स्वयंरोजगारांसाठी दिव्यांगांना संगणक, प्रिंटर व स्कॅनर देण्यात येणार आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी पालिका प्रत्येकी ७८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. १ हजार ३०० दिव्यांगांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. पालिकेने बेरोजगारांसह गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे.
५९९ दिव्यांगांसाठी अर्थसाहाय्य मंजूर
२०२२-२३ या वर्षात मुंबई शहर व उपनगरात राहणाऱ्या ५९९ दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता प्रिंटर स्कॅनरची खरेदी करण्यासाठी महिला अर्थसंकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून ४ कोटी ६९ लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते. या आर्थिक वर्षात स्वयंरोजगारासाठी अर्ज केला नाही.
पात्रतेसाठी निकष
वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे.
वार्षिक उत्पन्न ३ लाख किंवा त्यापेक्षा कमी.
लाभार्थ्याला शासकीय सार्वजनिक उपक्रमात कायमस्वरूपी नोकरी नसावी.
स्वयंरोजगार व्यवसायाकरिता जागेची उपलब्धता असल्याचे प्रतिज्ञापत्र. मान्यताप्राप्त संस्थेचे संगणकीय प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र.