Join us

स्वयंरोजगाराची संधी असतानाही २०२२-२३ या वर्षात एकही अर्ज नाही!

By जयंत होवाळ | Published: December 17, 2023 9:04 PM

दिव्यांग योजनेसाठी १० कोटींचा खर्च

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिव्यांगांना स्वयंरोजगाराची संधी मुंबई महापालिका उपलब्ध करून देत असली तरी २०२२-२३ या वर्षात कोणीही स्वयंरोजगारासाठी अर्ज केला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे २०२३-२४ या वर्षात ही योजना १ हजार ३०० दिव्यांगांकरिता राबवण्यात येणार आहे. योजनेसाठी सुमारे १० कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

स्वयंरोजगारांसाठी दिव्यांगांना संगणक, प्रिंटर व स्कॅनर देण्यात येणार आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी पालिका प्रत्येकी ७८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. सुमारे १ हजार ३०० दिव्यांगांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. पालिकेने बेरोजगारांसह गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे. याच धर्तीवर दिव्यांगांनाही स्वयंरोजगारांसाठी अर्थसहाय्य करण्यात येते.

५९९ दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य मंजूर

२०२२-२३ या वर्षात मुंबई शहर व उपनगरात राहणाऱ्या ५९९ दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता संगणक, प्रिंटर स्कॅनरची खरेदी करण्यासाठी महिला अर्थसंकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून ४ कोटी ६९ लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते. मात्र, या आर्थिक वर्षात स्वयंरोजगारासाठी कोणीही अर्ज केला नाही.

अर्ज नमुना कोठे मिळेल?

ही योजना वैयक्तिक लाभाची असल्याने या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारच्या अटी व शर्तीनुसार करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी प्रथम वस्तू खरेदी करून त्या वस्तूचे बिल पालिकेकडे सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. http:/portal.mcgm.gov.in येथे अर्जाचा नमुना मिळेल.

पात्रतेसाठी निकष

  • वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे.
  • वार्षिक उत्पन्न ३ लाख किंवा त्यापेक्षा कमी.
  • लाभार्थ्याला शासकीय सार्वजनिक उपक्रमात कायमस्वरूपी नोकरी नसावी.
  • स्वयंरोजगार व्यवसायाकरिता जागेची उपलब्धता असल्याचे प्रतिज्ञापत्र.
  • मान्यताप्राप्त संस्थेचे संगणकीय प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र.
  • दिव्यांग असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र.
टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका