१० वर्षांत उघडले नाही एकाही नगरसेवकाने तोंड; तक्रारींमध्ये मात्र वाढच वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 06:31 AM2023-11-01T06:31:28+5:302023-11-29T11:38:42+5:30
पालिका व माजी नगरसेवकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे मुंबई बनले ‘हवेच्या प्रदूषणाचे बेट’
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईच्या प्रदूषणावर सातत्याने चर्चा सुरू असून, यावर नियंत्रणासाठी आता महापालिकेने शहरासाठी प्रदूषणाशी लढा देण्याच्या उपाययोजनाही सुचविल्या आहेत. गेल्या १० वर्षांत प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पालिकेने तर या तक्रारींकडे दुर्लक्ष केलेच; पण, माजी नगरसेवकांनी यावर कोणतेही प्रश्न उपस्थित करण्याची तसदी घेतली नाही. २०२२ मध्ये तर प्रदूषणावर नगरसेवकांनी शून्य प्रश्न;उपस्थित केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तक्रारींकडे पालिका व माजी नगरसेवकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आज मुंबई ‘हवेच्या प्रदूषणाचे बेट’ बनल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठी आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी मुंबई महापालिकेने वॉर्डस्तरावर करण्यास सुरुवात केली आहे.वॉर्डस्तरा वर नेमण्यात आलेल्या विशेष पथकांकडून पाहणी होत असून, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्यास काम थांबविणे किंवा ते सील करण्यात येणार आहे. मात्र, हीच कडक कारवाई पालिकेकडून याआधी झाली असती तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली नसती, असे मत अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
तक्रारी (मागील १० वर्षांतील)
वर्ष - तक्रारींची संख्या - नगरसेवकांनी विचारलेले प्रश्न
- २०१३ ११७ १
- २०१४ १३५ ०
- २०१५ १३५ २
- २०१६ २२० २
- २०१७ २१५ ३
- २०१८ २८६ ०
- २०१९ २६९ ०
- २०२० २२० १
- २०२१ ४२४ १
- २०२२ २९२ ०
नगरसेवकांनीही घेतली नाही दखल
मुंबईकरांनी प्रदूषणाच्या तक्रारी केल्यानंतर त्या सोडविण्यात आल्या असल्या तरी त्यांच्यासाठी नियमावली किंवा मार्गदर्शक सूचना मात्र लगोलग जाहीर झाल्या नाहीत.महत्त्वाचे म्हणजे माजी नगरसेवकांकडून या वर्षांमध्ये सभागृहात प्रदूषणासंबंधित प्रश्नांवर उदासीनता दिसून आली. २०१३ ते २०२२ या वर्षांत माजी नगरसेवकांकडून फक्त १० प्रश्न विचारण्यात आले.
प्रदूषित हवेत श्वास घेण्याची वेळ
प्रजा फाउंडेशनने मे २०२३ मध्ये मुंबईतील नागरी समस्यांवर जारी केलेल्या अहवालानुसार २०१३ साली प्रदूषणाच्या ११७ तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्यांची संख्या २०२२ पर्यंत २९२ वर पोहोचली. आवश्यक अंमलबजावणी होऊ न शकल्याने मुंबईकरांना प्रदूषित हवेत श्वास घेण्याची वेळ आल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.