मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 06:18 AM2022-11-20T06:18:16+5:302022-11-20T06:18:50+5:30

फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाले ठाण मांडून असल्याविरोधात बोरिवलीच्या काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. गौतम पटेल व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

Not a single road in Mumbai is fit for walking, a hawker's trap; The High Court opened the hearing | मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी

मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी

googlenewsNext

मुंबई : शहरात एकही रस्ता चालण्यायोग्य नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयनेमुंबई महापालिकेची कानउघाडणी केली. हे शहर पादचाऱ्यांसाठी नसून वाहनचालकांसाठी बनवण्यात आले आहे, अशा शब्दांत न्यायालयाने पालिकेला सुनावले.

फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाले ठाण मांडून असल्याविरोधात बोरिवलीच्या काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. गौतम पटेल व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मोठ्या प्रमाणावर अनधिकृत स्टॉल्स आपल्या दुकानाबाहेर उभी असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. ११ नोव्हेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की, या याचिकेद्वारे या शहरातील मोठा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. फुटपाथवर सगळीकडे अडथळा आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यातील काही अडथळे अधिकृत किंवा अनधिकृत आहेत. त्यात दूध केंद्रे आणि पोलीस चौक्यांचा समावेश आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

नियोजन प्राधिकरण वाहनचालकांसाठी रस्ते आणखी रुंद करू पाहात आहे आणि त्याचवेळी पादचाऱ्यांसाठी आधीच कमी जागा असतानाही ती जागा आणखी कमी करण्याची परवानगी देत आहे, हे आम्हाला समजत नाही, असे न्यायालयाने म्हटले. पालिकेने केवळ बोरिवली पूर्व येथील पदपथांवरील अडथळ्यावर उत्तर देऊ नये. तर अशा प्रकारे पदपथांवर असलेल्या अडथळ्यांबाबत पालिकेचे काय धोरण आहे, याबाबत अधिक व्यापक आदेशावर पालिकेने उत्तर द्यावे, अशी आमची इच्छा आहे, असे न्या. पटेल यांनी म्हटले.

दरम्यान, शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेचे वकील सागर पाटील यांनी बोरिवली पूर्व येथील पदपथावरील बेकायदा स्टॉलधारक हटविल्याचे न्यायालयाला सांगितले. सध्या जरी पालिकेने त्यांना हटविले असले तरी पुन्हा हळूहळू ते पदपथावर कब्जा मिळवतील, अशी भीती याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली. त्यावर न्यायालयाने ही याचिका स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतली.

पादचारी रस्त्यांकडे वळण्याऐवजी तुम्ही (मुंबई महापालिका) विरुद्ध वळण घेत मोटारसायकलवाल्यांकडे वळलात. पायी आणि सायकल चालविणाऱ्या लोकांचे काय होणार? आज मुंबईत एकही रस्ता चालण्यायोग्य नाही. हे लांच्छनास्पद आहे. 
- मुंबई उच्च न्यायालय 

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर गणपती मंदिरालगत, दादर रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिमेला, सांताक्रूझ रेल्वे स्थानकाबाहेर पूर्व आणि पश्चिम, मालाड पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर, घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी सातत्याने ठाण मांडलेले असते. 

महापालिकेने कुर्ला, घाटकोपर, दादर, मालाडसह सांताक्रूझसारख्या परिसरात सातत्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. कुर्ला पश्चिमेकडील गणपती मंदिरालगत तर पालिकेचे वाहन कारवाई करण्यासाठी उभे असते. मात्र वाहन गेल्यावर अनधिकृत फेरीवाले परत त्याच जागी येतात.
 

Web Title: Not a single road in Mumbai is fit for walking, a hawker's trap; The High Court opened the hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.