Join us

'हा' अपघात नसून खून, 5 प्रवाशांच्या मृत्युनंतर संतापले गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 8:41 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

ठळक मुद्देमंगळवारी सोलापूर-अक्कलकोट मार्गावर खासगी वाहनाचा अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला. त्यावरुन, गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मुक्काम ठोकला आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर आणि संपावर ठाम आहेत. त्यामुळे, प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून खासगी वाहनाने अवघडतेनं प्रवास करावा लागत आहे. मंगळवारी सोलापूर-अक्कलकोट मार्गावर खासगी वाहनाचा अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला. त्यावरुन, गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. राज्यातील एसटी डेपोत कर्मचारी आंदोलन करत होते. तर, काही कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझादावर ठिय्या मांडला आहे. आझाद मैदानावर या आंदोलनात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत सक्रीयपणे उतरले आहेत. त्यात, मंगळवारी झालेल्या अपघातावरुन पडळकर यांनी संताप व्यक्त करत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

सरकारच्या हेकेखोर धोरणामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही. मंगळवारी अक्कलकोट-सोलापूर या महामार्गावरुन खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या पाच प्रवाशांनी आपला जीव गमावला. परंतु हा अपघात नसून राज्य सरकारने केलेले खून आहेत. नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करायला प्रवृत्त करणारे राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन सचिव आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी माजी मंत्री आ.सदाभाऊ खोत यांच्यासोबत आझाद मैदान पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात कारवाई करण्याबाबतचे निवेदन दिले.

स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन येताना अपघात

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन करून सोलापूरकडे येत असलेल्या प्रवासी जीपचा अपघात झाला. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ झाला. या अपघात पाच जण ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच १३ एएक्स १२३७ या जीपचा पुढील टायर फुटल्याने सोलापूर-अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर गाडी पलटी झाली.  

टॅग्स :गोपीचंद पडळकरएसटी संपअपघात