मुंबई - कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली असून येत्या 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, 'राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचे जराही आश्चर्य वाटत नाही. सरकार सूडाचे राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला मुळीच भीक घालत नाही. राज ठाकरे यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू.' काय आहे प्रकरण?राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी मिळून दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी २००८ साली या प्रकरणी आपले सर्व शेअर्स विकले होते. मात्र, त्यानंतरही राज ठाकरे या कंपनीत सक्रिय असल्याचे सांगत याप्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे.