Join us

गाडी फलाटावर लागूक नाय; डावीकडे की उजवीकडे खैसून उतूरुचा ताच प्रवाशांका कळोक नाय!

By सचिन लुंगसे | Published: August 25, 2022 12:46 PM

गणपतीक गावक कोकण रेल्वेने जाणारो कोकणी माणूस हैराण परेशान...

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणी माणूस गावाकडे निघाला आहे. आरक्षण फुल झाली आहेत. आता तर प्रवास शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र कोकण रेल्वेने गाव गाठणा-या प्रवाशांना रत्नागिरीमधील विलवडे स्थानकांत गाडी प्लॅटफॉर्मवर लागत नसल्याने उतरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचे हाल होत असून, प्रवाशांनी याप्रकरणी रेल्वेकडे तक्रार दाखल करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

कोकण रेल्वेच्या एका मुंबईकर प्रवाशाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील विलवडे स्थानक येथे १८ ऑगस्ट रोजी आम्ही सीएसएमटी सावंतवाडी स्पेशल रेल्वेने सकाळी १०.५० ला पोहोचलो. तेव्हा प्रवासी उतरवण्यासाठी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर लावण्यात आली. येथे उतरण्यासाठी प्लॅटफॉर्मची सुविधा नव्हती. अंदाजे ३० ते ३५ प्रवासी येथे उतरले. यात लहान मुले, वयोवृद्ध महिला तसेच पुरुषांचा समावेश होता. रेल्वेच्या सरळ जिन्याने पाच ते सहा फुट खाली उतरणे त्यांच्यासाठी कठीण जात होते. लोकांना गाडीच्या डाव्या बाजूला उतरावे की उजव्या बाजूला हेही कळत नव्हते. आधीच रेल्वे क्रॉसिंगमुळे रेल्वे दीड तास उशीरा पोहोचली होती. त्यात आम्हाला रेल्वेकडून अक्षरश: काहीही प्रतिक्रिया न देणा-या मेंढरासारखे वागवल जात होते.

कोकण रेल्वेच्या या वागणूकीबाबत प्रवाशांच्या ग्रुपमधील एका समाजसेवी व्यक्तीने रेल्वे स्थानकात तक्रार दिली. त्याची पावतीही स्टेशनमास्तरकडून सही शिक्क्यासहित घेतली. दुसरीकडे २० ऑगस्ट रोजी परतीच्या प्रवासासाठी निघालो. तेव्हादेखील विलवडे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्मवर सावंतवाडी सीएसएमटी स्पेशल रेल्वेची वाट बघताना समोर सायंकाळी ५.०५ वाजता दिवा सावंतवाडी मढगाव या रेल्वेमधील प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक २ येथे त्याच पध्दतीने उतरवण्यात आले.

कोणतीही प्लॅटफॉर्मची सुविधा नसताना वयोवृद्ध आणि ५ ते ६ महिन्यांचे बाळ त्या रेल्वेमधुन बिकट अवस्थेत उतरत होते. त्यामुळे कोकणी माणसांसाठी निर्माण केल्या जाणा-या सुविधांना एवढया निष्काळजीपणे का हाताळले जात आहे ? असा सवाल प्रवाशांनी केला आहे. दरम्यान, कोकण रेल्वेच्या यंत्रणांनी कार्यवाही करून रेल्वेतून उतरताना विलवडे स्थानक प्लॅटफॉर्म २ येथे थांबणा-या रेल्वेसाठी प्लॅटफॉर्मची सुविधा तसेच प्लॅटफॉर्म २ वरुन १ वर जाणा-या ब्रिजची व्यवस्था करून देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.

टॅग्स :भारतीय रेल्वेमुंबई