मुंबई : कमला मिल आगप्रकरणी अखेर १० दिवसांच्या शोधमोहिमेनंतर वन अबव्हचे तीन संचालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुरुवारी तिघांनाही भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी आपल्यावरील आरोप फेटाळले. पोलिसांनी मोजोसला वाचविण्यासाठी आपले नाव गोवल्याचा दावा वन अबव्हच्या संचालकांनी केला. आपल्याला अटक केली नसून आपणच शरणागती पत्करल्याचे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. तिघांच्याही सखोल चौकशीसाठी न्यायालयाने त्यांना १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.कमला मिल आगप्रकरणी वन अबव्हच्या तीन संचालकांसह व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संघवी बंधू आणि मानकर फरार झाले होते. अग्निशमन दलाच्या अहवालानंतर मोजोसमधील हुक्क्यामुळे आगीचा भडका उडाल्याचे स्पष्ट होताच त्यांनाही यात आरोपी बनविण्यात आले. युग पाठकला बेड्या ठोकल्या, तर युग तुली पसार झाला आहे. मानकरची आॅडी हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाकडे सापडताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. कारिया यानेच या तिघांना आश्रय दिला होता. त्याच्याच चौकशीतून पोलिसांना या तिघांची माहिती मिळाली आणि बुधवारी रात्री वांद्रे येथून संघवी बंधूंना अटक झाली. त्यापाठोपाठ गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मरिन लाइन्स येथून मानकरलाही अटक झाली.तिघांनाही गुरुवारी दुपारी भोईवाडा न्यायालयातील व्ही. बी बोहरा यांच्या खंडपीठासमोर हजर करण्यात आले. वन अबव्हच्या संचालकाच्या वतीने वकील किरण जैन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आग मोजोसमुळे लागली. मात्र पहिल्या दिवशी वन अबव्हच्या तिघांनाच मुख्य आरोपी केले. यामध्ये १० वर्षांची शिक्षा आहे या विचाराने ते घाबरले. त्यामुळे लपून राहिले. पोलिसांनी मोजोसच्या मालकांना वाचविण्यासाठी त्यांना टार्गेट केले. अग्निशमन दलाच्या अहवालातून सत्य समोर आले आणि पोलिसांचे पितळही उघडे पडले. त्यामुळे यातील खरे दोषी मोजोसचे मालक आहेत. अजूनही पोलीस मोजोसच्या मालकांच्या बचावासाठी धडपड करत आहेत, असे त्यांनी सांगितले.पोलिसांच्या वतीने संजय वाढवणे यांनी युक्तिवाद केला. कमला मिलमध्ये आग लागल्यानंतर ग्राहकांना वाचविण्याऐवजी वन अबव्हचे संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी पळून गेल्याचे एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. १४ जणांचा मृत्यू हा वन अबव्हमध्येच झाला. आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यांच्याकडील परवाने, अन्य परवानगीची माहिती घेण्यासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने तिघांनाही १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पोलिसांनी दावा फेटाळलामोजोस बिस्ट्रोचा छताचा भाग खुला असल्याने येथे सुरुवातीला आग पसरली नाही आणि तेथून निघण्याचा मार्ग असल्याने ग्राहक बाहेर पडले. तर वन अबव्हमधील लाकडी छतामुळे आग सर्वत्र पसरली. त्यात त्यांचे कर्मचारी निघून गेले. अशात तेथील बाउन्सरने ग्राहकांना शौचालयात लपण्याचा मार्ग दाखवला आणि तोच मार्ग त्याच्यासह १४ जणांच्या जिवावर बेतला.वन अबव्हमध्ये तीन आपत्कालीन मार्ग होते. मात्र तिन्हीही बंद होते. त्यामुळे ग्राहकांचा बळी गेला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींना शरणागती पत्करायची असती तर ते पोलीस ठाण्यात आले असते. आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही त्यांना अटक केले, असे अप्पर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी सांगितले.युग तुलीची कार जप्त : तुली याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्या अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तुली हा हैदराबादला नातेवाइकांकडे आहे. त्याच्या मागावर असलेले पोलीस हैदराबादमध्ये आहेत. त्यांनी तुुलीची कार जप्त केली आहे. लवकरच तुलीलाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.व्यवस्थापकांचा जामीन नाकारला : वन अबव्हचे व्यवस्थापक केवीन बावा, लिस्बन लोपेज यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्यांच्यावरील गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुरुवारी त्यांना जामीन नाकारण्यात आला.कारियानेच केली राहण्याची व्यवस्था : संघवी बंधू, मानकर हे तीन दिवस विशाल कारियाच्या जुहू येथील घरी राहिले. त्यानंतर संघवी बंधू काही दिवस राजस्थानमधील नातेवाइकांकडे राहिल्याचीही माहिती समोर आली आहे.
अटक नाही, आम्ही शरणागती पत्करली; वन अबव्हच्या संचालकांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:07 AM