नॉट अ बेस्ट : बस वाहक प्रभाकर तांबे यांचे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:09 AM2021-08-26T04:09:08+5:302021-08-26T04:09:08+5:30
मुंबई : कोरोना काळात लोकल आणि इतर सेवा बंद असताना केवळ आणि केवळ बेस्टने मुंबईकरांना आधार दिला. मात्र या ...
मुंबई : कोरोना काळात लोकल आणि इतर सेवा बंद असताना केवळ आणि केवळ बेस्टने मुंबईकरांना आधार दिला. मात्र या काळात बेस्टच्या चालकांसह वाहकांना कोरोनाची लागण झाली; आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता याच काळात मृत्यू झालेले बसवाहक प्रभाकर धनू तांबे यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे. तांबे यांच्या कुटुंबीयांना अद्यापही विम्याची रक्कम मिळालेली नाही. शिवाय त्यांच्या मुलालादेखील बेस्टमध्ये नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही.
बेस्ट प्रशासनात नोकरी करणारे प्रभाकर धनू तांबे यांच्या पश्चात परिवाराला बेस्ट प्रशासन काहीही मदत करण्यास तयार नाही. प्रभाकर तांबे हे दिंडोशी बस आगारात वाहतूक विभागात बस वाहक म्हणून काम करीत होते. त्यांचा कोरोनामुळे १ जून २०२० रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात घरात कमाविणारे कोणी नाही. त्यांच्या पश्चात बेस्टमध्ये नोकरी मिळावी, शासनाने जाहीर केलेल्या विम्याचे पैसे मिळावेत, यासाठी बेस्ट प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला आहे. शिवाय सातत्याने पाठपुरावादेखील केला. मदत मिळत नाही. परिणामी, बेस्टकडून मिळत असलेल्या अशा वागणुकीमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रभाकर तांबे यांचे निधन कोरोनामुळे झाले आहे, असे मनपाने दिलेल्या सर्टिफिकेटवर नमूद करण्यात आले आहे. बेस्ट यास दाद देत नाही. त्याचा मानसिक त्रास होत आहे. आपणास न्याय मिळावा, असे म्हणणे सातत्याने त्यांचे कुटुंब मांडत आहे, अशी माहिती फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी दिली. बेस्टच्या म्हणण्यानुसार, बसवाहक प्रभाकर धनू तांबे यांच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली असता कोविड - १९ या आजाराने मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पन्नास लाखांचे अनुदान मिळण्यासाठीच्या पात्रतेकरिता ठरविण्यात आलेल्या नियमावलीनुसार ते पात्र ठरत नाहीत.