Join us

नॉट बेस्ट : अनलॉकनंतरही महिलांसाठीच्या आरक्षित आसनांहून पुरुषांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:36 PM

घर ते ऑफिस आणि ऑफीस ते घर असा बेस्ट बसने प्रवास करताना या महिला वर्गाला अतोनात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 

मुंबई : लॉकडाऊननंतर अनलॉकचा प्रवास सुरु झाला आणि घरात बसलेला महिला वर्गही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामासाठी घराबाहेर पडला. मात्र घर ते ऑफिस आणि ऑफीस ते घर असा बेस्ट बसने प्रवास करताना या महिला वर्गाला अतोनात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कारण अनलॉकनंतरही बेस्ट बसमध्ये महिलांसाठींच्या आरक्षित आसनांवर पुरुष वर्ग बसून प्रवास करत असल्याने नाईलाजात्सव महिला वर्गाला बेस्टमधून उभ्याने प्रवास करावा लागत आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या बेस्ट बस गाड्यांमधून प्रवास करणा-या महिलांना हा त्रास होत असून, याकडे बेस्टने लक्ष द्यावे, असे म्हणणे महिलांनी  ‘लोकमत’कडे मांडले आहे.कोरोनाला हरविण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आणि रस्त्यावर धावणा-या बेस्टचा वेगही मंदावला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी बेस्ट रस्त्यांवर धावली. या काळात साहजिकच बेस्टचे प्रवासी कमी झाले. पुरुष वर्गाच्या तुलनेत बेस्ट बसने प्रवास करणा-या महिला प्रवाशांची संख्या घटली. परिणामी बेस्टमधील महिलांसाठीच्या आरक्षित आसनांवरून पुरुषांना प्रवास करता आला. विशेषत: प्रवास करणा-या महिला वर्गाची संख्याही कमी असल्याने आसनांबाबत अडचण आली नाही. मात्र आता अनलॉकनंतर बेस्टने प्रवास करणा-या महिलांचे प्रमाण वाढले. साहजिकच बेस्टमधील महिलांसाठीच्या आरक्षित आसनांवरून महिलांना प्रवास करता आला पाहिजे. मात्र सध्या चित्र उलट आहे. कारण अद्यापही महिलांसाठीच्या आरक्षित आसनांवर पुरुष प्रवास करत असून, महिलांना मात्र उभ्याने प्रवास करावा लागतो आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या बेस्ट बस गाड्यांमधून महिलांना उभ्याने प्रवास करावा लागतो आहे. वाहकाकडे तक्रार करूनदेखील तोडगा निघत नाही. महिलांसाठीच्या आरक्षित आसनांवर बसलेल्या पुरुष वर्गांना विनंती करूनही ऐकले जात नाही, अशी माहिती बेस्ट बसमधून प्रवास करत असलेल्या महिला प्रवाशांनी दिली.................................................नियमावलीचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. बेस्ट बसमधून प्रवास करताना एका सीटवर एकजण बसणे आवश्यक असून त्यांच्याकडे सॅनिटायझर व मास्क असणे आवश्यक आहे. खोकलताना व शिंकताना प्रवांशानी तोंडावर रुमाल धरला पाहिजे. उभा राहून प्रवास करताना गर्दी करायला नको. कंडक्टरने सुद्धा सुरक्षिततेसाठी मास्क व चष्मा  घालावा.  त्यांना पैसे  हाताळावे लागत असल्याने हात सॅनीटायझर करून घ्यावे. नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे.  मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असून ती पूर्ण नाहीशी होईल.................................................मिशन बिगिन अगेन अंतर्गत बेस्ट बस आणखी वेगाने धावू लागल्या. बेस्टकडून प्राप्त माहितीनुसार, शासनाने आणि मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार, या आदेशामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या नागरिकांना ८ जूनपासून बेस्ट बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवास करू देण्याचा घेण्यात आला. या निर्णयानुसार, बेस्टच्या बसगाड्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे दोन जणांकरिता असणा-या प्रत्येक आसनावर केवळ एक एकच प्रवासी बसून प्रवास करू शकतो. तसेच केवळ पाच प्रवासी उभ्याने प्रवास करतील................................................. 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई