मुंबई : जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडताना बेस्टच्या कर्मचारी वर्गास कोरोना रोगाची लागण होत असल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५० लाखाच्या विमा योजनेची मागणी आता जोर धरू लागली आहे. कोरोना रोगाच्या लढ्यात अत्यावश्यक सेवा म्हणून काम करणा-या, महाराष्ट्र शासन व मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचा-यांना जर ५० लाखाचे विमा कवच मिळू शकते तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना रोगाशी लढणा-या आमच्या बेस्ट कर्मचा-याला विमा कवच का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बेस्ट विद्युत पुरवठा विभागाचे उप अभियंता प्रकाश सोनमळे यांनी सांगितले की, आपले सर्व कामगार बंधू मुंबईकर जनतेच्या सेवेत गुंतले आहेत. अशावेळी त्यांच्या कुटुंबियांची मानसिक अवस्था किती भयानक असेल याचा विचार न केलेलाच बरा. कोरोनाचे सावट आपल्या अगदी जवळ आले आहे. त्यासाठी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५० लाखाच्या विमा योजनेचा पाठपुरावा करून ही योजना बेस्ट कामगारांसाठी कार्यान्वित करणे आज काळाची गरज आहे. ही योजना बेस्ट कामगारांना जाहीर झाली तर त्यांच्या कुटुंबियांना खूप मोठा आधार होईल. या योजनेचा प्रत्येक कर्मचा-यास होणे गरजेचे आहे.
कोणत्याही विगातील विज पुरवठा खंडीत झाल्यास संबंधित अभियंते व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचून योग्य त्या दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्वपदावर आणत आहेत. मात्र सध्या आमच्या अधिकारी व कर्मचारी यांना कोणती चिंता भेडसावत असेल तर ती मुंबईतल्या धारावी, अॅन्टोप हिल, संगम नगर, भारतीय कमला नगर सारख्या अनेक झोपडपट्टीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची. दाटी वाटीच्या झोपडपट्टीमध्ये आत शिरण्यासाठी जेमतेम दोन ते तीन फूट रुंदीच्या गल्ल्या असून आजघडीला त्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्या गल्ल्यांमध्ये आत जाताना बाहेर जाताना सोशल डिस्टिनिंग कसे ठेवणार? हा प्रश्नच आहे. रात्रीच्या वेळेला अंधारात अनेक दूषित पृष्ठभागाना स्पर्श होण्याची मनात भीती असते. अशाप्रकारे जीव मुठीत धरून अभियंते व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडीत आहेत.