भोलानाथ नाही ‘मौसम’ देणार पावसाची माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 07:52 AM2023-04-11T07:52:20+5:302023-04-11T07:52:33+5:30
स्थानिक हवामानाच्या सद्य:स्थितीची माहिती आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) अधिकृत हवामान अंदाज आता ‘मौसम’ या मोबाइल ॲप्लिकेशनवर
मुंबई :
स्थानिक हवामानाच्या सद्य:स्थितीची माहिती आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) अधिकृत हवामान अंदाज आता ‘मौसम’ या मोबाइल ॲप्लिकेशनवर उपलब्ध असून, मौसम या स्वतंत्र ॲपद्वारे नागरिकांना हवामानाची अद्ययावत माहिती, हवामान अंदाज आणि तीव्र हवामानाच्या घटनांचे इशारे मिळू शकतील.
ढगांची स्थिती
ॲपमधून शहरामधील तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वेग, पर्जन्यमान, सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्रोदय चंद्रास्ताच्या वेळा, जवळच्या रडारद्वारे टिपलेली ढगांची स्थिती याबाबतची अद्ययावत माहिती मिळेल.
हवामानाच्या तीव्र घटना
शहरामध्ये पुढील काही तासांमध्ये अपेक्षित असणाऱ्या विजा, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या हवामानाच्या घटनांचा इशारा, तसेच २४ तासांपासून पुढील दिवसाचा हवामान अंदाज ॲपवर असेल.
अगोदर मिळते माहिती
मुंबईत २४ आणि ४८ तासांसोबत आता दर ६ तासांचेही पूर्वानुमान दिले जाते. बदल मोठे असतील तर दर ३ तासांनी पावसाचे अंदाज वर्तविले जातात. शेतकऱ्याला पुढच्या पाच दिवसांचे पूर्वानुमान दिले जाते. वादळ असेल तर २४ तास अगोदर माहिती दिली जाते.
आयएमडी लोगो
सर्व जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांचे, हवामानाच्या घटनांचे इशारे ॲपवरून दिले जातील. आयएमडीचे मौसम ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, लोगोवरून ते ओळखता येईल.
पृथ्वी विज्ञान मंत्रालय
देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे निरीक्षण, मापन करतानाच विविध नैसर्गिक आपत्तींचे आगाऊ इशारे देण्याचे महत्त्वाचे काम पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे केले जाते.
पावसाची अनियमितता वाढली
भारतीय शेती प्रामुख्याने नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाची अनियमितता वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तर वर्षातील १२ महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यांत पाऊस पडल्याची उदाहरण आहेत.
पावसाचे अपडेट
मुंबईकरांना पावसाचे अपडेट दर पंधरा मिनिटांनी दिले जातात.
मुंबईमध्ये कुठे जास्त पाऊस होऊ शकतो. कुठे जास्त पूर येऊ शकतो याची माहिती दिली जाते.
सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. ९५ टक्के विजा आकाशातच असतात, फक्त ५ टक्के विजा जमिनीपर्यंत पोहोचतात.
पृथ्वीवर दर सेकंदाला ४० विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते.