Join us  

हाती बोनस नाही; तरी बाजारात गर्दी

By admin | Published: October 12, 2014 11:36 PM

दिवाळीसाठी अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने येथील आठवडाबाजारात ग्राहकांची दिवाळीपूर्व खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

राजू काळे, भार्इंदरदिवाळीसाठी अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने येथील आठवडाबाजारात ग्राहकांची दिवाळीपूर्व खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीमुळे बहुतांशी चाकरमान्यांचे बोनस हाती पडले नसले तरी उमेदवारांकडून झालेल्या लक्ष्मीदर्शनामुळे अनेकांनी दिवाळीपूर्व खरेदीस सुरुवातही केल्याचे रविवारी दिसून आले़अलीकडेच भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निलंगा येथील प्रचारसभेत मतदारांना उद्देशून केलेल्या भाषणात प्रलोभन दाखविल्याचे उघड झाले आहे. परंतु, अशी प्रलोभने दाखविणे त्यापूर्वीच ठिकठिकाणी गोपनीयरीत्या सुरू झाले होते. यंदाच्या निवडणुकीत आरोप-प्र्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मतदारांनी आपल्यालाच मते का मिळावी, अशा आशयाच्या खुलासेवार भाषणांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी मतदाराला आपल्याच जाळ्यात ओढण्यासाठी अनेक उमेदवार त्यांना विविध आमिषे दाखवित आहेत. ही आमिषे उघडपणे दाखविण्यात येत नसली तरी ती आपल्या विशेष कामगिरीवर असलेल्या हस्तकांमार्फत योजना बद्धरीत्या दाखविली जात आहेत. निवडणूक दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी पोलिसांनी तपासणी मोहिमेंतर्गत लाखोंची रोकड हस्तगत करून निवडणुकीतील संभाव्य गैरप्रकाराला काहीसा चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, काही ठिकाणी शासकीय यंत्रणेलाच हाताशी धरून मते खरेदीचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. या गैरप्रकारावर मतदारांचीही छुप्या मार्गाने झुंबड पडत असून आमची मते तुम्हालाच, अशा आणाभाकाही खाल्ल्या जात आहेत. काही मतदार आपल्या सोयीसुविधांचा मार्ग मोकळा करून घेत आहेत, तर काही तोल मोल के बोलच्या माध्यमातून उमेदवारांशी संवाद साधत आहेत. या माध्यमातूनच अनेक मतदारांची दिवाळीपूर्वीच निवडणूक कमाई झाली असल्याचे खुद्द मतदारांकडूनच सांगण्यात येत आहे. हा गैरप्रकार निवडणूक प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सुरू असला तरी ते पुरावे सापडत नसल्याचा कांगावा करीत आहेत. काही असो ऐन दिवाळीपूर्वी लागू झालेल्या निवडणुकीचा सुवर्णमध्य साधून अनेक मतदारांनी बोनसखेरीज निवडणूक कमाईतून रविवारच्या आठवडा बाजारात दिवाळीपूर्व खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.