विकास आराखडा नव्हे, हा तर गळफास!
By Admin | Published: March 29, 2015 12:11 AM2015-03-29T00:11:39+5:302015-03-29T00:11:39+5:30
सर्वसामान्य माणसांमध्ये समुद्राच्या छोट्या लाटा थोपवण्याचे धाडस असते, परंतु बिल्डर, राजकारणी आणि अधिकारी मंडळी तर सुनामी लाटा तयार करतात.
मुंबई : सर्वसामान्य माणसांमध्ये समुद्राच्या छोट्या लाटा थोपवण्याचे धाडस असते, परंतु बिल्डर, राजकारणी आणि अधिकारी मंडळी तर सुनामी लाटा तयार करतात. मुंबई शहराला न्यूयॉर्क अथवा टोकियो सारख्या शहराचा दर्जा देण्यासाठी आणलेला डीपी प्लॅन मुंबईकरांच्या गळ्याभोवतीचा फाशीचा फंदा आहे,अशी थेट टीका ज्येष्ठ गीतकार खा. जावेद अख्तर यांनी केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या विकास आराखड्यावर एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. नव्या आराखड्यामुळे या शहराची अवस्था आणखी भयाण होऊ नये आणि यात नेमके काय आहे हे लोकांना कळावे यासाठी आपण आजच्या परिसंवादाचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. यावेळी सलीम खान व जावेद अख्तर ही नामांकित ‘सलीम-जावेद’ जोडगोळी, आमिर खान, सलमान खान, फरहान अख्तर, रितेश देशमुख यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. विकास आराखड्यातील उणिवा यावेळी पी. के. दास दाखविल्या. त्यानंतर बोलताना जावेद अख्तर म्हणाले, देशातील सगळ्या राजकारण्यांचा ‘हिंदुस्थानी पॉलीटिकल क्लब’ आहे. या क्लबचे पाच सहा हजार सदस्य आहेत. तेच आलटून पालटून देश चालवतात... आपल्याला त्या क्लबचे मेंबर होता येत नाही. मुंबईत आज १ लाख घरं विक्री होत नाही म्हणून पडून आहेत आणि ११ लाख गोरगरिबांना घरं नाहीत. गोरगरिबांसाठी घरे बांधणे बिल्डरांच्या प्रतिष्ठेच्या विरुध्द मानले जाते, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)
पर्यावरणाला धक्का लावू नका - आमीर
आरे कॉलनीतल्या पर्यावरणाला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे आमीर खान म्हणाला. जर बीएमसीचा आराखडा चांगला आहे तर त्यात काय चांगले आहे याचे सादरीकरण त्यांनी जनतेसमोर केले पाहिजे अशी मागणीही त्याने केली.
बकाल आयुष्य - फरहान
मुंबई शहरात राहणाऱ्यांचे आयुष्य दिवसेंदिवस बकाल होत चालले आहे. हे शहर कोणाचे आहे हे ठरविण्याची वेळ आली आहे, असे फरहान अख्तरनी सांगितले. तर असे निर्णय घेताना आधी लोकांमध्ये गेलेच पाहिजे, त्यावर मतदान घेतले पाहिजे, असे रितेश देशमुखने स्पष्ट केले.