- सचिन लुंगसे मुंबई : मुंबई कधीच थांबली नाही. आपण प्रत्येक वेळी मुंबई पूर्वपदावर आणली. मात्र कोरोनाने सर्वांना जमिनीवर आणले. कोरोनाने सगळ्यांना १00 वर्षे मागे नेले आहे. गरीब आणि श्रीमंत एका पातळीवर आले आहेत. विशेषत: दाटीवाटीच्या मुंबईत कोरोनाला थोपविणे अवघड होते. मात्र महापालिकेला बऱ्यापैकी यश येत आहे. धारावी, पश्चिम उपनगर ही त्याची उदाहरणे आहेत. मात्र याचा अर्थ कोरोना संपला असा होता नाही. लढा अजून सुरू आहे. कारण तरुण पोलीस मृत्युमुखी पडले आहेत.
चांगले चांगले अधिकारी आपण गमावले आहेत. त्यामुळे काहीच अंगावर काढू नका. वेळ वाईट आहे. थोडा जरी घसा दुखाला किंवा लक्षणे दिसली तरी वेळीच उपचार करून घ्या. चित्र जितके दिसते तेवढे सोपे नाही. खूपच वाईट आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत महापौर बोलत होत्या.
मुंबईतील मृत्युदर वाढतो आहे?
आपण जीवनशैली बदलल्याने विषाणू, जीवाणू आपल्या घरात शिरकाव करू लागले. आपला मृत्युदर परदेशातील मृत्युदरापेक्षा कमी आहे. कारण आपल्या जेवणात गरम मसाले आहेत. आयुर्वेद आपल्याकडे आहे. याचा सकारात्मक फायदा होत आहे. डॉक्टर, नर्स यांचे संप झाले असते. मात्र आम्ही यावर नियंत्रण केले. त्यांचे प्रश्न सोडविले. शिकाऊ डॉक्टर कोरोनाचा उपचार करण्यास तयार नव्हते. मात्र यावर उपाय शोधले. कोविडमध्ये आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले. पहिल्या, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या नर्समध्ये आपण तृतीय वर्षाच्या नर्सची मदत घेतली. ही परिस्थिती आज आली आहे. आणखी किती वर्षांनी परत येईल, काहीच सांगता येत नाही.
आरोग्य सेवेसाठी निधी कसा उभा करत आहात?
आता शाळा वर्षभर तरी सुरू होणार नाहीत. परिणामी यातील काही पैसे आरोग्य सेवेवर वळवीत आहोत. नवे रुग्णालय उभे करत आहोत. आपण कोविडसाठी आपत्कालीन ठेवी वापरल्या आहेत. त्या दोन-तीन वर्षांत गठित कराव्या लागणार आहेत. यातून एक शिकलो, ते म्हणजे मंदिर, मशीद, गुरुद्वारा कमी करून रुग्णालय हीच मंदिरे करणे गरजेचे आहे. आपण मुंबईत अधिकाधिक स्वच्छता पाळत आहोत. प्रत्येक पावसाळ्यात माश्या मोठ्या प्रमाणावर येतात. या वेळी त्या आल्या नाहीत. कारण मुंबईकरांनी स्वच्छता पाळली. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला. मुंबईकरांनी महापालिकेला साथ दिली. साथीच्या आजारावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले, करत आहोत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात मुंबई महापालिकेने कौतुकास्पद काम केले आहे. प्रत्येक जण रस्त्यावर उतरला आहे. धारावी असो नाही तर अन्य काही, प्रत्येक जण फिल्डवर होता.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली जाते, कारण?
आज लोकसंख्या वाढली आहे. मुंबईचा विस्तार करतानाच प्रत्येक ठिकाणी सिमेंटचे बांधकाम होईल, असे होता कामा नये. मुंबईतल्या पाण्याचा स्तर कायम राहिला पाहिजे. सगळेच सिमेंट काँक्रि टीकरण केले तर त्याने पर्यावरण नष्ट होईल. मानवनिर्मित निसर्ग नसावा तर निसर्गनिर्मित मानव असावा. निसर्गाशी आपण बरोबरी करू शकत नाही. मुंबईत दरवर्षी जेवढे पाणी भरते तेवढेही भरता कामा नये. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पाण्याचा उपसा नियमित होत आहे.
राजकारण करणाऱ्यांना करत राहू दे. मुंबईचा आकार बशीसारखा आहे. समुद्रसपाटीपासून आपण खाली आणि समुद्र वर आहे. आपल्याला पाण्याचा उपसा करावा लागतो. शक्य तेथे पाण्याचा निचरा होतो आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्प उपयुक्त ठरला आहे. मुंबईत पाणी भरणार नाही, असा दावा आम्ही केला नाही. मात्र हे प्रमाण आता तासांवर आले आहे. महापालिका जबाबदारी घेते. आम्ही गाळ काढतो. बोटी तयार असतात. आम्ही आमचे वॉटर टेबल नेहमी साफ करतो. पण प्रत्येक वेळी महापालिकेकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. नाल्यावर झोपड्या आहेत. आता हे चूक की बरोबर हे प्रत्येकाने ठरवावे. महापौरपद हे शोभेचे नाही, जबाबदारीचे पद आहे.
धारावीबाबत श्रेयवादाची लढाई नकोच
च्वरळी आणि धारावीप्रमाणे आपण संपूर्ण मुंबईत काम करत आहोत. वेगाने तपासण्या सुरू आहेत. २४ वॉर्डमध्ये वॉररूम आहेत. अहवालदेखील आपण रुग्णाला देत आहोत. फक्त त्याचे पहिले रिपोर्टिंग महापालिकेने केले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात हे आकडे मागेपुढे झाले आणि आरोप-प्रत्यारोप झाले. आता धारावीबाबत श्रेयवादाची लढाई नको.
च्श्रेय धारावीला दिले पाहिजे. आम्हाला श्रेय नकोच. श्रेय महापालिकेला आहे. आम्ही काहीच केले नाही. आम्ही परीक्षण केले आहे. कोविडला हरविण्यासाठी आम्ही फोकस केला आहे. आम्ही एक एक पायरीवर जातो आहे. धारावी ही धारावीकरांनी वाचविली आहे. लोकांनी साथ दिली म्हणून आम्ही नाही, सगळे जिंकलो आहोत, असे महापौरांनी यावेळी नमूद केले.