Join us

गळती, चोरीमुळे पाणी पुरेना! दैनंदिन १ हजार ३४२ दशलक्ष लिटर पाणी वाया, अभियंत्यांची ३८% पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 12:21 PM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत १०० टक्के पाणीसाठा झाला असून, पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी कपातीची भीती नाही.

मुंबई :

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत १०० टक्के पाणीसाठा झाला असून, पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी कपातीची भीती नाही. मात्र, जल अभियंता विभागाच्या माहितीनुसार दैनंदिन पाणीपुरवठ्यापैकी तब्बल १ हजार ३४२ दशलक्ष लिटर पाण्याची चोरी व गळतीला मुंबईकरांना सामोरे जावे लागते. हे प्रमाण दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या ३४ टक्के इतके आहे. त्यामुळे काही वेळेला मुंबईला पाणी पुरत नाही. 

जल अभियंत्यांची ३८ टक्के पदे अभियंता विभागात रिक्त आहेत. त्यामुळे पाणीगळतीसारख्या घटनांवर तातडीने उपाय योजण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडतात. मुंबईला तानसा, मोडक सागर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, अपर वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. ही धरणे मुंबईपासून १०० कि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर आहेत. याशिवाय मुंबईच्या परिसरात विहार आणि तुळशी जलाशय आहेत. सुमारे ५०% पाणीपुरवठा हा उदंचन व्यवस्था वापरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणला जातो. जलवाहिन्यांचा बराच भाग भूमिगत आहे.    जल अभियंता विभागात १,१०० नियोजित जागांपैकी ३८ टक्के अभियंता पदे रिक्त आहेत. निवडणूक काळात अनेक कर्मचारी व अभियंत्यांना निवडणूक ड्यूटी लावली जाते. त्यामुळे पाणीगळती शोधणे, त्यांची दुरुस्ती यावर परिणाम होत असल्याचे माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे. अभियंत्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी त्यांची मागणी आहे. 

शहरामध्ये अनेक प्रकल्पांची कामे सुरू असून, अनेकदा त्यामुळे जल वाहिन्यांना हानी पोहोचते. पाणी गळतीचे प्रमाण या आधी ३८ ते ४० टक्के इतके होते. मागील तीन वर्षांत जलवितरण व्यवस्थेत नवीन जल वाहिन्यांचा पर्याय, क्राऊलर कॅमेरे यामुळे ते प्रमाण ३४ टक्क्यांवर आले आहे. गळती कमी करण्यासाठी जलबोगद्याचे काम सुरू झाले आहे. - पुरुषोत्तम माळवदे, प्रमुख जल अभियंता, मुंबई पालिका 

पाणी गळती का होते?जलवाहिनी ब्रिटिशकालीन असल्यामुळे जीर्ण झाली आहे. त्यामुळे अनेकदा जलवाहिन्यांना तडे जातात, जलवाहिन्या फुटतात.काही ठिकाणी जलवाहिन्यांमधून पाणीचोरीचे प्रकारही घडतात. त्यामुळे शुद्ध पाणीही दूषित होते. अनेकदा अन्य कामे सुरू असताना किंवा बिल्डरांच्या चुकीमुळे जलवाहिनी फुटल्यास पालिका त्यांच्याकडून दंड वसूल करते. जलवाहिन्यांची दुरुस्तीसाठी येणारा खर्च आणि जलवाहिनी फुटल्यामुळे वाया गेलेले पाणी यांचे मूल्यमापन करून दंड आकारला जातो. जलवाहिनीचा आकार, पाण्याचा दाब व किती वेळ पाणी वाहून गेले, यानुसार वाया गेलेल्या पाण्याचे पैसेही वसूल केले जातात.

टॅग्स :पाणीकपातमुंबई