- श्रीकांत जाधव
मुंबई : गेल्या मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याचा शुभमुर्हूत काढून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्यात आलेल्या ‘मराठी भाषा भवन’ मुख्य केंद्राची वर्षभरात एक वीटही रचली गेलेली नाही. १८ महिन्यांत भाषा भवन खुले केले जाईल, अशी ग्वाही तत्कालीन मराठी भाषा मंत्री यांनी दिली होती. यापैकी एकाही वचनाची पूर्तता झाली नसल्याने मराठी भाषाप्रेमींमध्ये नाराजी आहे.
मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीकरिता चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंड विनामोबदला मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय झाला आहे. सुमारे २१०० चौ.मी. क्षेत्र मराठी भाषा भवनास मिळणार आहे. अंदाजे १२६ कोटी रुपये एवढा खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईचे मे. पी. के. दास ॲण्ड असोसिएट्स यांची वास्तू विशारद म्हणून निवड करण्यात आली होती.
गेल्यावर्षी २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चर्नी रोड येथील भाषा भवनाच्या जमिनीचे भूमिपूजन झाले होते. डिसेंबर २०२१ मध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येईल, तर पुढील १८ महिन्यांत मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती मराठी तत्कालीन भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती. यादरम्यान सत्तांतर झाले. आता हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी भाषा मंत्री म्हणून दीपक केसरकर यांच्यावर आहे. मात्र, अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.
केवळ जागेला कुंपण चर्नी रोड येथील जागेला केवळ पत्र्याचे कुंपण मारून ठेवण्यात आले आहे. या जागेत एका चौकीदाराचे निवास आणि जागेवर सर्वत्र गवत उगवलेले आहे. कोणतेही बांधकाम येथे सुरू करण्यात आलेले नाही. याबाबत मराठी भाषा विभागात संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत पूर्ण माहिती त्यांनी सांगितली नाही.