Join us

'या' महिलांवरील अन्यायाबद्दल शब्दही नाही काढला?, सुप्रिया सुळेंना आमदाराचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 4:29 PM

नागपुरातील या व्हिडिओतील घटनेनुसार, एका कारला महिलेने ओव्हरटेक केले.

मुंबई/परभणी - ट्रॅफिक जामच्या समस्येमुळे सातत्याने भांडण किंवा वाद होताना आपणास पाहायला मिळतात. नागपुरातील अशाच एका वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे रहिवाशी असलेल्या देवेंद्र फडणवीसांना सवाला केला आहे. मात्र, आता, भाजपच्या महिला आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनाही सुप्रिया सुळेंना सवाल केला आहे. तसेच, पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलंय.  

नागपुरातील या व्हिडिओतील घटनेनुसार, एका कारला महिलेने ओव्हरटेक केले. त्यामुळे प्रचंड संतापलेल्या कार चालकाने तिला भर चौकात बेदम मारहाण केली. शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यांनंतर सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ शेअर करत गृहमंत्र्यांना या ट्विटमध्ये मेन्शन केलंय. ''राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का? असा सवाल करत  प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणीही सुळेंनी केली आहे. 

आता सुप्रिया सुळेंच्या ट्विटला  भाजपच्या परभणीतील जिंतूर मतदारसंघातील आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी ट्विट करुन रिप्लाय दिलाय. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, व्हिडिओतील या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केल्याचं ऐकलंय. पण, आपल्या सत्ताकाळात केतकी चितळे, कंगना राणौत, नवनीत राणा, स्वप्ना पाटकर या महिलांवर झालेल्या अन्यायाबद्दल आपण आजपर्यंत एक शब्दही काढला नाही, असे आमदार बोर्डीकर यांनी म्हटलंय.

टॅग्स :सुप्रिया सुळेपरभणीभाजपाआमदार