मुंबई : रोजगार आणि गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्ट अप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी केवळ पोकळ घोषणा आणि आश्वासने देण्यात आली. केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार स्टार्ट अप कंपन्यांच्या धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिल्या १५ राज्यांतही नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केला.चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राला स्टार्टअप कॅपिटल करू, अशी घोषणा मुख्यमं^त्र्यांनी केली होती. गुंतवणुकीबाबतच्या अनेक फसव्या घोषणांप्रमाणे मुख्यमंत्र्यांची ही घोषणासुद्ध फसवी ठरली आहे. खुद्द केंद्र सरकारनेच तसा अहवाल दिला आहे. शिवाय, स्टार्टअप धोरण कसे राबवावे यासाठी प्रगत गुजरातकडून धडे घ्यावे, असे निर्देशही केंद्राने महाराष्ट्राला दिले आहेत. कामगिरी मोजण्यासाठी ३८ निर्देशांक ठरविले होते. त्यातील १७ निर्देशांकात कोणतेच काम झाले नसल्यामुळे महाराष्ट्राने माहितीच पाठविली नाही. केंद्राच्या अहवालात गुजरातला १०० गुण मिळाले असताना महाराष्ट्र मात्र तळाशी आहे. औद्योगिक धोरणात फक्त जाहिराती, इव्हेंटचा भरणा आहे.राज्याची बदनामी करू नका - मुनगंटीवारदेशातील सर्वाधिक २,७८७ स्टार्ट अप महाराष्ट्रातच असल्याचे अहवालात म्हटले आहे. मुख्यमंत्री पद भूषविलेल्या नेत्यांनी तरी किमान राज्याची बदनामी करू नये, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.देशातील सर्वाधिक २,७८७ स्टार्ट अप महाराष्ट्रातच असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल केवळ स्टार्ट अप धोरणाच्या असेसमेंटचा आहे. गुंतवणूकदारांच्या अपेक्षाही आपल्याकडून अधिक असल्याने परसेप्शन इंडेक्समध्ये महाराष्ट्राला ९३ टक्के गुण मिळाले. देशाचा औद्योगिक विकास दर ४.४ टक्के असताना राज्याचा ६.५ टक्के आहे. चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र पहिल्या १५ राज्यांतही नाही - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 5:26 AM