'हा गोवा नाही, महाराष्ट्र आहे', भाजपाच्या चाणक्यांना पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 09:12 PM2019-11-25T21:12:38+5:302019-11-25T21:13:54+5:30
बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. संविधानाला साक्ष घेऊन आमदारांनी पक्षाविरोधात कोणतंही कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी बोलताना शरद पवारांनी नवीन आमदारांना सदस्यत्वाची खात्री देत ती माझी वैयक्तिक जबाबदारी असल्याचं म्हटलं. तसेच, हा गोवा नसून महाराष्ट्र आहे, असे म्हणत भाजपा नेत्यांना आणि त्यांच्या चाणक्यांना गर्भित इशाराही दिलाय.
बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, अशा शब्दात पवारांनी भाजपाच्या नेत्यांना दम भरला. तसेच, आमदारांना विश्वास देताना, तुमचे सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका, तुमची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे, व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला केलेल्याला नाही असं सांगत आमदारांना शब्द दिला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या व्यक्तीला पक्षात दूर करण्याचा, अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला त्यांना पक्षाला कोणताही आदेश देण्याचा अधिकार नाही, घटनातज्ज्ञ, संसदेतील दिग्गज तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. आदेश देण्याचा अधिकार अजित पवारांना नाही, जे अशा गोष्टी करतायेत ते संभ्रम निर्माण करण्याचा काम करत आहेत. याबाबत नवीन आमदारांनी निश्चिंत राहा असं त्यांनी सांगितले.