मुंबई: काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचं पत्र त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पाठवलं आहे. आपण आगामी निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे दत्त निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रिया दत्त या प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रसचे माजी दिवंगत खासदार सुनील दत्त यांच्या कन्या आहेत. प्रिया दत्त यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं कारण देत लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याचं नेतृत्त्वाला सांगितलं आहे. 'गेली काही वर्ष अतिशय चांगली होती. मात्र राजकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना माझी तारेवरची कसरत होत आहे. माझ्याकडे देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या मी व्यवस्थितपणे हाताळल्या असं वाटतं. मात्र राजकारण सोडून आयुष्यात बरंच काही आहे. त्याकडे आता मला लक्ष द्यायचं आहे,' असं दत्त यांनी प्रसिद्धी माध्यमांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केलं आहे. प्रिया दत्त यापूर्वी अनेकदा पक्षांतर्गत कामकाजावर टीका केली होती. 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दत्त यांनी पक्षावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसचं काँग्रेसचा पराभव करते, अशा शब्दांमध्ये त्यांनी पक्षातील काहींवर निशाणा साधला होता. मात्र राहुल गांधींच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं होतं. राहुल गांधी हे चांगले नेते असून ते पक्षाला एका विशिष्ट दिशेनं घेऊन जात आहेत, अशी स्तुतीसुमनं दत्त यांनी उधळली होती.