अच्छे नव्हे, बुरे दिन आले..!, सर्वसामान्यांची केंद्रासह राज्य सरकारवर बोचरी टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:56 AM2017-11-08T02:56:56+5:302017-11-08T02:57:06+5:30
भारताच्या इतिहासात अर्थव्यवस्थेत नोटाबंदी ही ऐतिहासिक घटना आहे. या नोटाबंदीच्या निर्णयाची बुधवारी वर्षपूर्ती होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांना अच्छे नव्हे तर बुरे दिन आले आहेत,
मुंबई : भारताच्या इतिहासात अर्थव्यवस्थेत नोटाबंदी ही ऐतिहासिक घटना आहे. या नोटाबंदीच्या निर्णयाची बुधवारी वर्षपूर्ती होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांना अच्छे नव्हे तर बुरे दिन आले आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य मुंबईकरांमधून व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीची घोषणा केली आणि भल्याभल्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नोटाबंदीच्या घोषणेपासून ३१ डिसेंबरपर्यंत माजलेला हाहाकार सर्वांनाच चक्रावून गेला. हजार आणि पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यापासून दोन हजारांच्या नोटा प्राप्त करण्यासाठी झालेली दमछाक सर्वांनीच अनुभवली. सुट्ट्या पैशांची झालेली चणचण, बंद पडलेले आर्थिक व्यवहार, मध्येच उदयास आलेली बार्टर सिस्टीम, सुरू झालेल्या कॅशलेस व्यवहारासारख्या मुद्द्यांनी सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले. मात्र काळा पैसा हद्दपार करायचा म्हणून सुरू झालेल्या प्रक्रियेला सर्वसामान्यांनी पाठिंबा दिला. परंतु हा पाठिंबा फार काळ टिकला नाही. बँकांसह एटीएमसमोर लागलेल्या रांगांनी सर्वसामान्यांना नाउमेद केले. ‘मन की बात’ऐवजी चौकाचौकात ‘जन की बात’ रंगू लागली. नोटाबंदीमुळे उभ्या राहिलेल्या आर्थिक अडचणींमुळे घर कसे चालवायचे, असा प्रश्न पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी नंतर मात्र नोटाबंदीवर टीकास्त्र सुरू केले.
नोटाबंदीनंतर रिअल इस्टेटसह सर्वच क्षेत्रांना तडाखे बसू लागले. दरम्यानच्या काळातही सर्वसामान्यांचे हाल सुरूच होते. आज ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच सर्वसामान्यांनी आता आणखी कुठला निर्णय होतो की काय, याची धास्ती घेतली आहे. ‘अच्छे दिन’ सुरू होण्याऐवजी ‘बुरे दिन’ सुरू झाले असे म्हणत सर्वसामान्यांनी केंद्रासह राज्यातल्या सरकारवर बोचरी टीका सुरू केली.
नवी धोरणे आणा,
पण सामान्यांना त्रास नको
नोटाबंदीला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण तरीदेखील सामान्य लोक, व्यापारी, शेतकरी यातून सावरलेले नाहीत. मागील वर्षी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भाजी व्यवसायावरील बाजारभावावर व उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. बाजारभावावर परिणाम होऊन पंधरा ते वीस टक्क्यांनी बाजाराची स्थिती घसरली होती. भाजीसारख्या नाशवंत मालाचा व्यवहार करण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली. नोटाबंदीनंतर जेमतेम सहा महिने व्यापार करताना दमछाक झाली होती. काळा पैसा बाहेर येण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. पण शेतकरीवर्गाकडे काळा पैसा नसतो. त्यामुळे सरकारने नवीन धोरणे आणली पाहिजेत आणि शेतकरी व सामान्य व्यापारी यांना याचा त्रास होणार नाही याचाही विचार केला पाहिजे.
- शंकर पिंगळे, माजी संचालक,
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
नोटाबंदीनंतर सुट्या पैशांची चणचण जाणवत होती. कॅशलेसचा पर्याय निवडून अॅप वापरणे सुरू केले. पण अवघ्या काहीच दिवसांत कॅशलेसचा फिव्हर उतरला. खूप दिवस व्यवसायावर परिणाम दिसत होता. तीन ते चार महिन्यांनंतर धंदा स्थिर झाला.
- रवींद्र उभारे, टॅक्सीचालक
मी शेअर टॅक्सी चालवतो. त्यामुळे दहा-वीस रुपये ग्राहकांसाठी जास्त नाहीत. परंतु लांब पल्ल्याच्या अंतरावर टॅक्सी चालवणाºया आमच्या सहकाºयांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक ग्राहक सुट्टे पैसे नाहीत यामुळे टॅक्सीपेक्षा चालत जाणे पसंत करत होते. नोटाबंदीनंतर तीन महिने धंदा होत नव्हता.
- नितीन चव्हाण, टॅक्सीचालक
नोटाबंदीनंतर सुरुवातीचे दोन महिने सुट्ट्या पैशांअभावी प्रवाशांसह आम्हा रिक्षाचालकांना फटका बसला होता. कॅशलेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद नसल्यामुळे त्याचा काही फायदा झाला नाही. तीन महिन्यांनंतर धंदा पूर्ववत झाला.
- शशिकांत कदम, रिक्षाचालक
नोटाबंदीच्या निर्णयामुळे पूर्वीपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. सुट्या पैशांची चणचण भासत आहे. प्रवाशांनी जर पाचशे अथवा दोन हजार रुपयांची नोट दिली तर उरलेले पैसे परत करण्यासाठी आमच्याकडे पैसे नसल्यामुळे मोठा फटका बसत आहे.
- संजय शिरसाट, रिक्षाचालक
नोटाबंदीच्या पूर्वीचा जो व्यवहार होता आणि नोटाबंदीनंतरचा व्यवहार यामध्ये खूप मोठी तफावत आहे. नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होऊनदेखील रिक्षाचालकांचा व्यवहार सुरळीत झालेला नाही. आता आम्हाला गरजेपुरतेचे पैसे मिळतात. त्यामुळे नोटाबंदी हा सरकारचा निर्णय पूर्णपणे फसलेला आहे.
- सुरेश कट्टे, रिक्षाचालक
नोटाबंदी झाल्याने धंद्यावर परिणाम झाला आहे. घरच्या गरजा भागत नाहीत. पैसा बाजारातच नसल्याने आमच्याकडेदेखील आलेला नाही. गरजेपुरता पैसा न मिळाल्याने व्यवहार काटकसर करून चालवावा लागत आहे. - बाबूराव ससाणे, रिक्षाचालक
ग्राहकांनी साहित्य खरेदी केल्यानंतर २ हजार रुपयांची नोट दिल्यानंतर उरलेले पैसे परत करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. खूप दिवस धंदा थंडावलेला होता. यंदा पुन्हा असा कोणताही निर्णय पंतप्रधानांनी घेऊ नये असे वाटत आहे.
- फूलचंद गुप्ता, फेरीवाला
सुट्ट्या पैशांअभावी कॅशलेस होण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला शिक्षित ग्राहकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. दोन-तीन महिन्यांनंतर लोकांकडे पुरेसे सुट्टे पैसे आले. शंभर, पन्नासच्या मुबलक प्रमाणात नोटा आल्यानंतर सर्वांनी कॅशलेस व्यवहार बंद केले.
- दिलीप रेवडेकर, फेरीवाला
गृहिणींनी काटकसर करून, न सांगता केलेली बचत ही अचानक सगळ्यांसमोर आणावी लागली. नोटाबंदीमुळे मुलांवर लक्ष न देता महिनाभर बँकेतच रांगा लावाव्या लागल्या.
- सुनीता धोंडे, गृहिणी
नोटाबंदीच्या काळात भाजी खरेदी करायला पैसे नव्हते. तसेच घरात वापरात येणाºया वस्तू घेता आल्या नाहीत. मुलांच्या ट्यूशनची फी देता आली नाही. दूधवाले, भाजीवाले जुने पैसे घेत नव्हते. प्रवासात खूप त्रास झाला. त्या वर्षी घरात शुभकार्य असल्यामुळे महिनाभर खरेदी करता आली नाही.
- रजनी चव्हाण, गृहिणी
बचत करून ठेवलेले सगळे पैसे काढले. एटीएममधून फक्त दोन हजार मिळायचे. दोन हजारांत घर कसे चालवायचे, हा प्रश्न पडलेला. अचानक घरात मोठा खर्च आला तर काय करायचे ही चिंता होती.
- रूपाली खोपडे, गृहिणी
नोटाबंदीनंतर काही दिवस धंदा पूर्णपणे ठप्प होता. पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा अशी समस्या निर्माण झाली होती. नोटाबंदीनंतरचे काही दिवस आठवले तरी ताण येतो. पंतप्रधानांनी असा निर्णय पुन्हा घेऊ नये असे वाटते.
- राजरतन गुप्ता, फेरीवाला
८ नोव्हेंबरला सकाळी बँंकेतून पंधरा हजार रुपये काढले. त्याच रात्री नोटाबंदी झाली. काढलेल्या पैशांचे करायचे काय, हा प्रश्न होता. त्या रात्री झोपच आली नाही. महिन्याचा किराणा उधारीवर भरला. पेपर, केबल, दूधवाले यांची त्या महिन्यात उधारी ठेवावी लागली. दुसºया महिन्यात मात्र आमची खूप धांदल उडाली.
- रजनी कदम, गृहिणी
नोटाबंदीनंतर सुट्ट्या पैशांचा प्रश्न सोडविण्यासाठी कॅशलेस प्रणालीचा वापर सुरू केला. त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. लोकांकडे पुरेसे सुट्टे पैसे आल्यानंतर कॅशलेस व्यवहार बंद झाले. शासनाचा ‘कॅशलेस इंडिया’ हा प्रयत्न अयशस्वी ठरला. - प्रकाश पाटील, लघू उद्योजक
नोटाबंदीमुळे बँक आणि एटीएमसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागले. त्यातच सुट्या चलनाचा प्रश्न निर्माण झाल्याने बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे साहित्य खरेदी करता येत नव्हते. नोटाबंदीनंतरचे काही दिवस विसरता येणे अवघड आहे.
- छाया खोचरे, गृहिणी
कॅशलेशच्या साम्राज्यात सायबर गुन्हेगारांची दहशत
१प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनमधील ‘२ जी’चे नेटवर्क ‘४जी’पर्यंत पोहोचले. अशात नोटाबंदीच्या कॅशलेश व्यवहारात हाच वेग घरातल्या गृहिणीपर्यंत पोहोचला. मोबाइल रिचार्जपासून घरचा बाजारही शहरी भागांसह काही खेड्यापाड्यांतही आॅनलाइन झाला. पण कॅशलेस व्यवहाराभोवती सायबर गुन्हेगारीचा वेढा वाढत चाललाय हे मात्र दुर्लक्षित आहे. या वर्षभरात देशभरावर ओढावलेल्या सायबर गुन्हेगारीच्या सावटावर रोख आणणे पोलिसांसमोर आव्हान आहे. २देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण जास्त असून, त्यात अर्थातच मुंबई आघाडीवर आहे. राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या २०१५च्या अहवालातून याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०१५मध्ये देशभरात ११,५९२ सायबर गुन्हे घडले असून ८,१२१ लोकांना पोलिसांनी अटक केली. या आकडेवारीनुसार, २०११ सालात देशभरात २,२१३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्या तुलनेत २०१५मध्ये ही आकडेवारी पाचपटींनी वाढली. ३देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दिवसाला ४ ते ५ सायबर गुन्हे दाखल होत असून, गेल्या वर्षी मुंबईत ९२८ सायबर गुन्हे दाखल झाले. तर नोटाबंदीनंतर या वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांतच हा आकडा ९८३ वर पोहोचला आहे. प्रत्यक्षात याची संख्या अधिक आहे. अनेक जण रक्कम कमी असल्याने पुढाकार घेत नाहीत. बँकेत तक्रार केली तर पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला जातो. पोलिसांत गेले की हद्दीचा वाद अशात तक्रारींसाठी अनेक जण पुढे येण्यास टाळाटाळ करीत आहेत.