त्यात तथ्य नाही! राज ठाकरे गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलले; कार्यकर्त्यांना आदेश दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 07:35 PM2022-05-03T19:35:44+5:302022-05-03T19:37:53+5:30
औरंगाबादमध्ये राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल; मनसेचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमण्यास सुरुवात
मुंबई: जाहीर सभेत चिथावणीखोर विधानं केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सभेला परवानगी देताना पोलिसांकडून १६ अटी घालण्यात आल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचं उल्लंघन झालं. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांसह राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राज यांना औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल राज यांनी प्रथमच भाष्य केलं आहे.
मला पोलिसांकडून अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. पोलिसांकडून नोटीस आल्यावर पुढे काय करायचं ते ठरवेन. ती माहिती पोलीस आणि माध्यमांनादेखील दिली जाईल, असं राज ठाकरेंनी सांगितल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे. मला कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे मी औरंगाबादमध्ये पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
उद्याच्या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांना सूचना
३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा, ४ मेपासून ऐकणार नाही, असा आक्रमक पवित्रा राज ठाकरेंनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज यांनी पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
१. आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून करा.
२. जिथे अनधिकृत भोंग्यांच्या माध्यमातून अजान होते, तिथे हनुमान चालिसा लावा
३. मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्यासाठी रितसर परवानगी मागा
४. अनधिकृत अजान सुरू झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा
५. अनधिकृत भोंग्यांबद्दल पोलिसात लेखी तक्रारी करा
६. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होत असेल तर आंदोलन करा.