घराेघरी नाही, पण वस्त्यांमध्ये जाऊन लस देण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:05 AM2021-04-26T04:05:27+5:302021-04-26T04:05:27+5:30
महापाैर किशाेरी पेडणेकर; एकही मुंबईकर लसीकरणापासून वंचित राहता कामा नये लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लसीकरणाचा साठा जसा उपलब्ध ...
महापाैर किशाेरी पेडणेकर; एकही मुंबईकर लसीकरणापासून वंचित राहता कामा नये
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसीकरणाचा साठा जसा उपलब्ध आहे, त्याप्रमाणे लस दिली जात आहे. केंद्रावर लस उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊनच लस घेण्यास जावे. सध्या तरी घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई महापालिकेचा विचार नाही. मात्र, वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी सर्वांना लस द्यायची आहे. एकही मुंबईकर लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, हेच उद्दिष्ट आहे, असे महापाैरांनी सांगितले. कुठल्याही दुर्घटनेत रुग्णांचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महापालिकेच्या सर्व कोविड रुग्णालयातील मेडिकल ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली जात आहे. वरळी येथील प्लांटची क्षमता सहा ते सात हजार लीटर मेडिकल ऑक्सिजनची असून, वांद्रे येथील मेडिकल ऑक्सिजन प्लांटची क्षमता ही ६० हजार लीटरची आहे. वांद्रे येथे ८० सिलिंडर बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहेत. मुख्य प्लांटला बिघाड झाल्यानंतरही दोन दिवस ऑक्सिजन पुरेल इतकी क्षमता आहे, असे पेडणेकर यांनी सांगितले.
* गर्दी करू नका, सरकार जो निर्णय घेईल तो सर्वांच्या हिताचा!
मुंबईत गर्दी होते तिथे गर्दी कमी व्हावी, ही अपेक्षा आहे. दुकानदारांनी स्वयंसेवक नेमावेत. गर्दी करू नका. सरकार जो निर्णय घेईल तो सर्वांच्या हिताचा आहे. काेराेना प्रतिबंधासाठी आवश्यक आहे. म्हणूनच सहकार्य करा. मिळून काेराेनाला हरवूया, असे आवाहन महापाैरांनी केले. कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. याचे श्रेय मुंबईकर, डॉक्टर आणि नर्स यांचे आहे. सुरक्षित राहा, स्वत:ची आणि एकमेकांची काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले.
........................................