मुंबई : मुंबईतघरांचा नाही तर परवडणाºया घरांचा तुटवडा आहे. यासाठी आपण एकत्रित आणखी प्रयत्न करायला हवेत, असे मत टाटा इन्स्टिट्यूूट आॅफ सोशल सायन्सेसच्या अधिष्ठाता डॉ. अमिता भिडे यांनी व्यक्त केले. डॉक्टर महेंद्र कदम यांच्या पुनर्विकास गृहसंकल्पना या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आणि समर्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी डॉ. अमिता भिडे म्हणाल्या की, सद्यस्थितीत अनेक गृहसंस्था पुनर्विकासाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन कसे घ्यायचे याबाबतची माहिती पुनर्विकास गृहसंकल्पना पुस्तकात आहे. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्य अभियंता यांच्या हस्ते डी. आर. हाडदरे यांच्या हस्ते कौन्सिल फॉर अफोर्डेबल हाऊसिंग या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. आॅल इंडिया आर्किटेक्ट एज्युकेशनचे माजी अध्यक्ष आणि सर जे जे कॉलेज आॅफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा म्हणाले की, बरेचदा इमारत दुरुस्तीचा खर्च हा अवाढव्य असतो आणि पुनर्विकास हाच एक चांगला पर्याय असतो. पुनर्विकासानंतर देखभाल खर्च कसा कमी करता येईल, हे या पुस्तकांमधून तुम्हाला कळेल असे ते म्हणाले.
डॉ. महेंद्र कदम म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झोपडपट्टीमुक्त मुंबई या स्वप्नामुळेच मला या संकल्पनेसाठी प्रेरणा मिळाली. पुनर्विकासाद्वारे ही परवडणारी घरे बांधताना सामाजिक समस्यांचा विचार आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा. मुंबईत प्रत्येक प्रकारच्या उत्पन्न गटातील माणसाला त्याच्या गरजेप्रमाणे मुंबईत परवडणारे घर मिळायला हवे. यावेळी म्हाडाचे माजी मुख्य अभियंता अरविंद महाजन, ज्येष्ठ वास्तुविशारद डॉ. अनिल दारशेतकर, जे जे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अर्जुन मुरुडकर, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे नायगाव शाखेचे कार्यवाह डॉक्टर कृष्णा नाईक, भरारी प्रकाशनाच्या लता गुठे आदींसह विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.