स्वप्निल कुलकर्णी
मुंबई : संक्रांत साजरी करताना ही गोडी वरवरची असू नये याची काळजी घ्यायला हवी. मानवी वृत्तीतील गोडवा वाढवणं हाच समाजपटलावर घडणाऱ्या नानाविध कटू घटनांवरचा उतारा असू शकतो.सध्या सर्व जण आरोग्य आणि सामाजिक आव्हानात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहोत. मागील वर्ष अतिशय कटू आठवणीत गेले. परंतु नववर्षाच्या सुरुवातीला ‘संक्रांती’च्या रूपाने आणि तिळगुळाच्या साहाय्याने येणाऱ्या ‘गोडव्याने’ गतवर्षीच्या कटू आठवणी कायमच्या पुसल्या जाव्यात, इतकेच सांगावेसे वाटते.
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण. या दिवशी आपण एकमेकांना 'तीळगूळ घ्या आणि गोड बोला' असं म्हणत तीळगूळ देतो. अशा या सौख्य, स्नेह वाढविणाऱ्या सणाबद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात,देव तिळी आला । गोडे गोड जीव झाला।साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥पापपुण्य गेले । एका स्नानेची खुंटले ।तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥तीळ हे स्नेहाचे, प्रेमाचे, भक्तीचे प्रतीक मानले आहे, तो स्निग्ध आहे. 'देव तिळी आला, म्हणजे देव हाच बोलण्यात, सहवासात, प्रेमात आला. आमच्या भक्तीच्या अधीन झाला! 'जना' मध्येच जनार्दनाची वस्ती आहे. प्रेम वाटा प्रेमच मिळेल आणि या प्रेम संवर्धनात दुःखाची नुसती चाहूलही नाही. म्हणूनच आपण म्हणतो 'तीळ-गूळ घ्या, गोड बोला' नुसती तिळाची स्निग्धता नको तर, गुळाची गोडीही हवी!
भारतीय संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकरसंक्रांत. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना या दिवशी तीळगुळ देऊन 'तीळगुळ घ्या, गोडगोड बोला' असे म्हणून एमकेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जाते. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तीळगुळ दिला जातो.गोडी प्रत्येक दिवसात आहे. समाधानाने खाणाऱ्याला प्रत्येक घास गोड लागतो हा अनुभव आहे. केवळ तीळगुळानेच नात्यातील गोडी वृद्धिंगत होते असं नाही तर खेळीमेळीच्या वातावरणात घेतलेल्या प्रत्येक जेवणात हा मधुर रस पाझरत असतो. म्हणूनच या संक्रांतीनिमित्त जिभेचा नव्हे तर वृत्ती आणि प्रवृत्तीतील गोडवा वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा.
शुभेच्छांचा 'ट्रेंड' बदललाnगोडीकडे आकृष्ट होणं हा माणसाचा स्वभाव आहे. या स्वभावाला, वृत्तीला संक्रांत साद घालते. गतवर्षातील कटू आठवणींवर उतारा शोधण्याचा हा एक सांस्कृतिक आणि समंजस मार्ग आहे. त्यामुळे तीळगुळ देऊन गोड बोलण्याचं साकडं घालत, शुभेच्छा-सदिच्छांमार्फत संदेशाची देवाणघेवाण करत तो साजरा होतो. nपूर्वी टपालाच्या बंद पाकिटातील दोन-चार हलव्याच्या दाण्यासोबत या शुभेच्छा पोहोचायच्या, आता त्या समाजमाध्यमांद्वारे पोहोचतात. शब्दांना लोंबणारे भावनांचे घोस फेसबुकची वॉल रंगवून टाकतात. व्हॉट्सॲपवरील विविध समूहांवर हीच गोडी पसरत राहते.
आव्हानांना सामोरं जाण्याची 'सिद्धता'nथंडीचा बहर असताना क्षीण रवीतेजाचं हे पर्व आणि भास्कराचा मकर राशीतील प्रवेश, उत्तरायणाचा प्रारंभ अवघ्या भारतवर्षात साजरा होतो. म्हटलं तर हा स्थित्यंतराचा, संक्रमणाचा काळ आहे. म्हणजेच काही अडथळे येतील आणि ते पार करत मार्गक्रमण करावे लागेल हे सूचित करणारे हे दिवस आहेत. nदुसरीकडे येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्याची सिद्धताही यात आहे. म्हणूनच प्रतिकूलतेतून अनुकूलता शोधणारा, प्राप्त परिस्थितीत शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवण्याचे मार्ग सुचवणारा हा सण आहे.