Join us  

स्वत:च्या मतदारसंघात आघाडी नाही, पण...

By दीपक भातुसे | Published: June 07, 2024 11:32 AM

उत्तर पश्चिमचा निकाल उद्धवसेना आणि भाजपच्या आमदारांचे टेन्शन वाढवणारा

मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या झालेल्या लढतीत शिंदे सेनेचे रवींद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला असला तरी वायकर ज्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून मागील अनेक वर्ष आमदार आहेत, त्या स्वत:च्या मतदारसंघात त्यांना लोकसभा निवडणुकीत आघाडी मिळालेली नाही. उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना वायकरांच्या विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली आहे.

उत्तर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर दिंडोशी आणि अंधेरी पूर्व मतदारसंघात उद्धव सेनेचे आमदार असून जोगेश्वरी पूर्व या एका मतदारसंघात स्वत: वायकर आमदार आहेत.

रवींद्र वायकर आमदार असलेल्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातच त्यांना स्वत:ला लोकसभा निवडणुकीत आघाडी घेता आली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्वमध्ये ९०,६५४ मते घेऊन वायकर जिंकले होते. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना या विधानसभा मतदारसंघात ७२,११८ मते मिळाली आहेत. तर उद्धव सेनेच्या ठाकरे यांना ८३,४०९ मते मिळाली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शिंदे सेनेसाठी इथून अवघड जाईल अशी चिन्हे आहेत.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी जोगेश्वरी पूर्वसह दिंडोशी आणि वर्सोवा या दोन मतदारसंघात अमोल कीर्तिकरांना आघाडी आहे. वर्सोवा मतदारसंघात कीर्तिकरांना मिळालेली आघाडी लक्षवेधक आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वर्सोवातून भाजपच्या भारती लवेकर ४१,०५७ मते घेऊन विजयी झाल्या होत्या. मात्र २०२४ च्या लोकसभेत इथे अमोल कीर्तिकरांना ८०,४८७ मते मिळाली आहे. तर वायकरांना ५९,३९७ मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा मतदारसंघातील लढत जिकीरीची ठरण्याची चिन्हे आहेत.

उद्धव सेनेकडे असलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात मात्र शिंदे सेनेच्या वायकरांनी आघाडी घेतली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इथून रमेश लटके यांनी ६२,७७३ मते घेऊन विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर इथे नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ६६,६१८ मते घेऊन विजयी झाल्या होत्या. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात वायकरांना ७८,७६४ मते तर कीर्तिकरांना ६८,६४६ मते मिळाली आहेत. इथून वायकरांना १०,११८ मतांची आघाडी मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

गोरेगाव विधानसभा निवडणुकीत विद्या ठाकूर या विद्यमान आमदार असून त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८१,२३३ मते मिळाली होती. त्यांच्या मतदारसंघात रवींद्र वायकरांना ९४,३०४ मते मिळाली आहेत. तर कीर्तिकर यांना ७०,५६२ मते मिळाली आहेत. लोकसभेची इथली आघाडी लक्षात घेता भाजपसाठी पुढील विधानसभा या मतदारसंघात सोपी असेल.

अंधेरी पश्चिम मतदारसंघातून भाजपचे अमित साटम आमदार आहेत. त्यांना २०१९ च्या विधानसेला ६५,६१५ मते मिळाली होती. तर या लोकसभा निवडणुकीत इथून वायकर यांना ७०,७४३ मते मिळाली आहेत. तर कीर्तिकरांना ७०,५२२ मते मिळाली आहेत. वायकरांना साटम यांच्या या मतदारसंघातून अवघी २२१ मतांची आघाडी मिळाली आहेत. त्यामुळे आघाडी मिळाली असली तरी हा विधानसभा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपला मेहनत करावी लागणार आहे.

टॅग्स :मुंबई उत्तर पश्चिमरवींद्र वायकरमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४