मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा साथीदार मेहुल चोक्सीने वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडल्याचा कांगावा उच्च न्यायालयात केला आहे. यासाठी त्याने त्याच्या आजाराचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.
चोक्सीने आपण अँटिग्वामध्ये राहत असून तपास यंत्रणांना सहकार्य करत आहे. जर न्यायालयाने संमती दिल्यास तपास अधिकारी अँटिग्वाला चौकशीसाठी येऊ शकतात, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच भारत पीएनबी घोटाळ्यामुळे सोडला नसून उपचारासाठी सोडला आहे. आजारपणामुळे मी प्रवास करू शकत नाही. मात्र, खटल्याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. जर बरे वाटले तर लवकरच भारतात येईन, असेही चोक्सीने म्हटले आहे.
तसेच विशेष न्यायालयासमोर आणि तपास अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे येण्याची तयारीही चोक्सीने दर्शविली आहे. ईडी आणि सीबीआयने आपल्याला ज्या खटल्यांमध्ये आरोपी बनविले आहे ते चुकीचे आहे. आजारपणामुळे अँटिग्वाच्या बाहेर जाऊ शकत नाही. मात्र, तपास अधिकारी येथे येऊ शकतात, असेही चोक्सी याने सांगितले आहे.