मुंबई - कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मूळच्या उत्तर भारतातील प्रदेशवासियांनी आपल्या गावी रेल्वेने जाण्यासाठी अर्ज भरले होते . परंतु उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ सरकार तसेच रेल्वे प्रशासना कडून परवानगी नसल्याने मीरा भाईंदर मधील अडकलेल्या कामगार , मजुरांसाठी एकही श्रमिक ट्रेन सुटत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने असंख्य लोकांनी पायी वा ट्रक, टेम्पोने जाण्यास सुरवात केली . एसटी बस मध्यप्रदेश सीमेवर मोफत सोडत असल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, अद्यापही कामगार व मजूरांचे गावी जाण्यासाठी हाल सुरुच आहेत. यावरुन, आता केवळ सरकारच नाही तर रेल्वेही रस्ता भरकटल्याचं एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन औवेसी यांनी म्हटलं आहे.
मीरा भाईंदर मधील कामगारआदी 1800 प्रवाश्यांना घेऊन 21 मे रोजी सायंकाळी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर साठी निघालेली श्रमिक ट्रेन भरकटली होती . सुमारे 25 तासात गोरखपूरला पोचणारी सदर ट्रेन 48 तास उलटले तरी गोरखपूरला न पोहचता ओडिशातून पश्चिम बंगाल नंतर झारखंडला दाखल झाल्याने आतील लहान मुलं , महिला व अन्य प्रवाश्यांचे पाणी - अन्नावाचून हाल झाले. ट्रेन 60 ते 65 तासांनी गोरखपूरला रविवारी सकाळी पोहचेल अशी शक्यता होती. मात्र, चालक मार्ग चुकल्याचे प्रवाश्यांनी सांगितले. रेल्वेच्या भोंगळ कारभारावर टीकेची झोड उठली आहे. आता, खासदार औवेसी यांनीही यावरुन सरकारला लक्ष्य केले.
''एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी मोदी सरकावर टीकास्त्र सोडले आहे. केवळ सरकारच नाही, आता रेल्वेही रस्त्या भटकल्या आहेत, असे म्हणत लॉकडाऊन काळातील अनियोजनतेवर औवेसी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. असुदुद्दीन औवेसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत वक्तव्य केलं आहे. देशातील नागरिकांना केवळ कोरोना महामारीचाच त्रास सहन करावा लागत नसून सरकारच्या अनियोजित लॉकडाऊनचाही त्रास होत आहे. सरकारने अनियोजित आणि असंवैधानिक लॉकडाऊन केल्याचा आरोप औवेसी यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलला मेन्शन करत, औवेसी यांनी मोदी सरकारच्या जादुई स्पर्श असलेल्या प्रत्येक घटनेला संकटाचा सामना करावा लागतो,'' असेही औवेसी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लॉकडाऊन अद्यापही ३१ मे पर्यंत देशात सुरुच आहे. मात्र, सरकारने शिथिलता दिल्यामुळे अनेक उद्योग व वाहतूक यंत्रणा सुरु झाल्याचे दिसून येते. तसेच, दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, लोकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. नेमकं काय सुरु अन् काय बंद हा प्रश्न अनेकांना पडलाय. यावरुनच, औवेसी यांनी नियोजनाचा अभाव असलेलं लॉकडाऊन मोदी सरकारने केल्याचं म्हटलं आहे.