- सीमा महांगडे मुंबई : २०१८च्या जागतिक साक्षरता दिनानिमित्त युनेस्कोने साक्षरता आणि कौशल्य विकास थीम ठरविली आहे. याच पार्श्वभूमीवर केवळ विद्यापीठातून पदवी घेणारी नाही, तर कौशल्ययुक्त सक्षम आणि साक्षर पिढी घडावी व त्यातून महाराष्ट्राला कौशल्य विकासाच्या उपक्रमात अग्रेसर ठेवता यावे, यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील आहे.भारतात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होते. कारण राज्यात गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उद्योगांसाठी गरजेच्या साधनांची उपलब्धता हे आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सध्या १ लाख ३० हजार विद्यार्थी क्षमता असून, ती २ लाख करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. कमी मागणी असलेल्या व कालबाह्य झालेला ट्रेंड्स बदलून राज्यातील ८०० औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण परिषद तयार करत आहे. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयटीआयमधील विद्यार्थ्यांना थेट उद्योग कार्यस्थळी प्रशिक्षित केले जाणार आहे. मॉडेल आयटीआयअंतर्गत सर्व संस्थांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, सॉफ्ट स्किल याची उभारणी केली जात आहे. राज्यात प्रमोद महाजन कौशल्यव उद्योजकता विकास अभियान, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व किमान कौशल्य कार्यक्रम - जिल्हा नियोजन अंतर्गत सद्यस्थितीत २,९०,९५२ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत औद्योगिक अस्थापनांबरोबर १२३ सामंजस्य करार झाले आहेत. सद्यस्थितीत १,९१,१०३ जणांना प्रशिक्षण दिले असून, यातून १,०७,०९३ रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.>कौशल्ययुक्त महाराष्ट्र व रोजगारयुक्त महाराष्ट्र हे स्वप्न पूर्ण करण्यास शासन कटिबद्ध आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दिलेल्या उभारीमुळे महाराष्ट्रात कौशल्ययुक्त मनुष्यबळाद्वारे रोजगार निर्मिती झाली आहे.- संभाजी निलंगेकर पाटील, कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री.
फक्त पदवीधर नव्हे, तर कौशल्ययुक्त सक्षम पिढी घडविणार; साक्षरता, कौशल्य विकासात ताळमेळ साधण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:17 AM