Join us

यंत्रणाच नव्हे, प्रवासीही अलर्ट व्हायला हवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 12:32 AM

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे गेले काही दिवस दोन्ही देशांच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे गेले काही दिवस दोन्ही देशांच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील अतिमहत्त्वाची ठिकाणे; विशेषत: मुंबई महानगराची लाइफलाइन असलेल्या ‘रेल्वे’ला हायअलर्ट देण्यात आला आहे. येथील सर्व स्थानकांत कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. मात्र, दररोज लाखोंच्या घरातील प्रवाशांची तपासणी करणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांनीही सुरक्षायंत्रणांना हातभार लावत स्वत:ही अलर्ट राहणे गरजेचे आहे. तसेच एखादी संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्यास त्वरित सुरक्षा यंत्रणांनाही ते लक्षात आणून दिले पाहिजे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’च्या व्यासपीठावर मांडले. त्यातील निवडक प्रतिक्रियांचा धांडोळा...>...तरीही यंत्रणांना काम करू द्या!सार्वजनिक ठिकाणे व वाहतूक व्यवस्थेसाठी अतिदक्षतेचा इशारा दिल्यानंतर वेगवेगळ्या सुरक्षायंत्रणांची थोडावेळ होणारी धावपळ बऱ्याचदा हास्यस्पद आणि केविलवाणी वाटते. खरे तर देशातील व राज्याराज्यांतील सुरक्षायंत्रणा व त्यांच्या विविध विभागात असणाऱ्या समन्वयातील अभावामुळे सामान्य जनतेला हा त्रास सोसावा लागत आहे; पण हे कुणीही स्पष्टपणे बोलण्याचे धाडस करीत नाही. मुंबईच्या उपनगरी रेल्वेवरही अशा प्रसंगी कडक सुरक्षा तपासणी केली जाते. नोकरी-धंद्याच्या व्यापात व सतत घाईत असणाºया रेल्वे प्रवाशांना अशा अचानक तपासाचा निश्चितपणे त्रास होतो. मागील पाच-सहा वर्षांत आरपीएफ व जीआरपी यांनी प्रवासी महासंघाला सोबत घेऊन ‘स्वयंशिस्त-सुरक्षा व स्वच्छता अभियानांतर्गत अनेक स्थानकांवर प्रवासी जागृतीचे मोठे कार्यक्रम घेतले. त्याचे परिणामही चांगले झाले. मात्र, ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून रेल्वे प्रशासनाने त्यात सातत्य ठेवले पाहिजे, रेल्वे प्रवाशांना नम्र आवाहन आहे सुरक्षाउपाय हे आपल्यासाठीच आहेत, थोडा त्रास झाला तरीही कृपया सुरक्षायंत्रणांना त्यांचे काम करू द्या.- मनोहर शेलार, संस्थापक, उपनगरीय रेल्वेप्रवासी महासंघ>आपणही सजग राहणे आवश्यकपुलवामा घटनेनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाकिस्तान महत्त्वाच्या शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासाठी भरवस्तीत किंवा बस, रेल्वे अशा रहदारीच्या सेवेत स्फोटके ठेवण्याची शक्यता आहे. आपली सुरक्षायंत्रणा मजबूत असली तरी ती प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य नाही. मुंबईच्या रेल्वे, बसमध्ये तर कठीणच आहे. रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये आपल्या आजूबाजूला लक्ष हवे. एखादी पिशवी सीट खाली किंवा वर ठेवलेली असेल तर ही कोणाची आहे हे विचारून जर ती एखाद्या प्रवाशाची असेल तर त्याला ती आपल्याकडे ठेवण्यास सांगणे. चारही बाजूस आपली नजर ठेवणे आवश्यक आहे. एखादी संशयास्पद वस्तू आढळल्यास रेल्वे पोलिसांना त्वरित कळविणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपणच दक्ष राहिलो तर आपल्याबरोबर इतरांचीही सुरक्षा सांभाळता येईल. पोलीस यंत्रणेसह आपणही सजग राहणे आवश्यक आहे. - अरुण खटावकर, लालबाग>मुंबईकरही सुरक्षेसाठी मदत करू शकतोपुरोगामी महाराष्ट्रात आजच्या काळात एकंदरच महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ३५ लाखांच्या वर आहे व महाराष्ट्र पोलीस दलाचे आजच्या काळात दोन लाखांच्या आसपास एवढेच मनुष्यबळ आहे. यावरून असे सिद्ध होते की, एक पोलीस ६५0 नागरिकांच्या संरक्षणासाठी पहारा देतो. सुरक्षित प्रवासासाठी किंवा महत्त्वाच्या स्थळांसाठी हे संरक्षण पुरेसे आहे का? तर नाही. यासाठी महाराष्ट्रात जास्तीत जास्त पोलीस मनुष्यबळ वाढविणे खूप गरजेचे आहे. जसे पोलिसांचे संरक्षणाचे कर्तव्य आहे तसेच कर्तव्य आम नागरिकांचेही आहे. हे नागरिकांनी विसरायला नको. भा.फौ.प्र.सं. कलम ३७ प्रमाणे सामान्य मुंबईकरसुद्धा रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी मदत करू शकतो.- रशिद पटवेकर, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई>रेल्वेस्थानकांत मोनो-मेट्रोसारखी सुविधा हवी!पुलवामा येथील झालेल्या हल्लानंतर देशाने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमध्ये असलेले अतिरेकीसुद्धा देशातील मुख्य आणि अतिव्यस्त शहरांमध्ये हल्ला करण्याची शक्यता आहे. मुंबई तसेच दिल्लीमध्ये हल्ला करू, असे सांगत आहेत. आपल्या देशाने स्वरक्षणासाठी तसेच हल्ला होऊ नये यापासून बचावासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारताने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. आपण मेट्रो, मोनो यामध्ये जात असताना आपल्याला तिकीट काढलेले कुपन प्रवेशद्वारावर टाकले जाते. त्याशिवाय दरवाजे उघडले जात नाहीत, अशी सुविधा सीएसएमटी स्थानकावर असणे आवश्यक आहे. मच्छीमारांमध्ये गुप्तहेर ठेवणे गरजेचे आहे. कारण आपल्या मुंबईतला समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. मुंबईच्या समुद्रकिनारेमार्गे येण्याची दाट शक्यता आहे. समुद्रकिनाºयावर आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आहे. लोकल आणि रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत. - चित्तरंजन लाड, नवीन पनवेल>प्रवासी म्हणून जबाबदारी वाढली!भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि खास करून मुंबई, दिल्ली, पंजाब, गुजरात, राजस्थान या शहरांसाठी हायअलर्ट जारी केल्याने येथील रेल्वेस्थानकांवर वाढीव सुरक्षा तैनात केली. त्यामुळे रेल्वेस्थानकांना छावणीचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलसह रेल्वेस्थानकातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता केवळ सुरक्षा यंत्रणांची, पोलिसांची, गुप्तचर यंत्रणांचीच नव्हे, तर आपली सर्वांची प्रवासी म्हणून जबाबदारी वाढली आहे. सर्वांनीच येणाºया काळात अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. संशयित हालचालीची माहिती देणाºयाला उलट चौकशी न करता, त्रास न देता ती जाणून घेऊन वरिष्ठांपर्यंत आणि संबंधितांपर्यंत पोहोचवून पुढील कारवाई केली पाहिजे. सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांकडून पूर्ण खबरदारी घेण्यात येत असली तरी नागरिकांनी जागरूकतेने प्रवास करणे आवश्यक आहे.- कमलाकर जाधव, बोरीवली>आपणच सुरक्षारक्षकदेशाच्या सीमेवरील वातावरण तणावपूर्ण असल्याने त्याचे पडसाद देशभर पसरलेले आहेत. पुलवामा येथे आतंकवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात आपल्या सुरक्षा दलाचे ४२ जवान शहीद झाले. यावर आपल्या देशातून धडा शिकविण्यासाठी पाकिस्तान हद्दीतील अतिरेक्यांच्या ठाण्यांवर हल्ला केला. या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तापले आहे. त्यामुळे सर्वत्र हायअलर्ट देण्यात आला आहे. सीएसएमटीसारख्या मोठ्या स्थानकावर सुरक्षारक्षक वाढविण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातून दररोज किमान ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात, असे असूनदेखील एवढ्या प्रवाशांची सुरक्षा केवळ मोजक्या सुरक्षारक्षकांवरच असेल तर ते तरी कुठे आणि कसे पुरे पडणार? त्यापेक्षा आपणच सुरक्षारक्षक आहोत, असे समजून प्रत्येक नागरिकाने आपापल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. एखादी संशयास्पद वस्तू दिसल्यास किंवा संशयास्पद हालचाल लक्षात येताच सुरक्षारक्षकांच्या नजरेस आणून देणे आवश्यक आहे. १९९३ मधील दंगल किंवा २६/११ च्या हल्ल्यात आपल्या देशातील काही समाजकंटकांनी केवळ पैशांच्या आमिषाने दहशतवाद्यांना साथ दिली. यामुळे आपल्याच भारतीय देशबांधवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. ज्या देशाचे अन्न खातो, ज्यांचे मीठ खातो त्याच्याशी गद्दारी करायची नाही असे ठरवले, तर पाकिस्तानच काय कोणतीच परकीयशक्ती वा आतंकवादी या देशाकडे मान वर करून बघणार नाहीत. ‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा कृतीतून दिसायला हवी. अतिरेक्यांना पर्यायाने पाकिस्तानला भारताने दिलेली ही मोठी अद्दल लक्षात घेऊन पाकिस्तान आता तरी काही धडा घेईल तर ठीक आहे.- मुरलीधर धंबा, डोंबिवली