पैसा आणि वेळ नाही तर मुंबईकरांनी आरोग्यही गमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 05:28 PM2020-09-30T17:28:09+5:302020-09-30T17:28:42+5:30
रोड मार्च छेडणार आंदोलन
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील पायाभूत सेवा सुविधा विशेषत: रस्त्यांनी गेल्या २० वर्षांत मुंबईकरांचे कंबरडे मोडले आहे. उर्वरित घटकांनी देखील मुंबईचे हाल केले असून, त्यामुळे झालेल्या वायू प्रदूषणाने मुंबईकरांचा केवळ वेळ आणि पैसा गेलेला नाही तर त्यांच्या आरोग्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. परिणामी या विरोधात आवाज उठविण्यासाठी रोड मार्च २ ऑक्टोबर रोजी आंदोलन छेडणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खडडे बुजविण्यासाठी रोड मार्च कार्यान्वित आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मुंबईतल्या पायाभूत सेवा सुविधांची अवस्था अगदी वाईट झाली आहे. परिणामी याबाबत बोलता यावे, मुंबईच्या विकास योजनेत अविकसित रस्त्यांवर चर्चा करता यावी म्हणून हे जनआंदोलन हाती घेण्यात आले आहे. सरकारी, निमसरकारी अथवा महापालिकेसह एमएमआरडीएसारखी प्राधिकरणे आजही पायाभूत सेवा सुविधांबाबत पुरेशी अग्रेसर नाहीत. परिणामी मुंबई आजही धक्के खात आहे. मुंबईतल्या या सगळ्या महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श करता याव म्हणून मुंबई मार्चच्या टिमने वांद्रे आणि दहिसर दरम्यानच्या क्षेत्रासाठी एक विकास योजना बनविली आहे. याद्वारे अडथळे काय आहेत? याची माहिती मिळेल. आणि याद्वारे अधिकाधिक माहिती अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून गोळा होईल.
मुंबईतले वाहतूकीचे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून ठोस उपाय योजले गेले नाहीत. परिणामी मुंबईकरांचे मोठे नुकसान होते. यात मुंबईकरांचा पैसा आणि वेळ तर वाया जातो आहेच पण आरोग्याचेही नुकसान होते आहे. परिणामी याबाबत आवाज उठविण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्री हनुमान मंदिर सभा, राम मंदिर रोड, बोरीवली येथे रोड मार्च कडून आपले म्हणणे मांडले जाईल, असे पंकज त्रिवेदी यांनी सांगितले.