पुरुषोत्तम आठल्येआजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर अधिक वेगवान व विस्तृत होऊ लागला आहे. तरीसुद्धा या माध्यमातून मराठीचा वापर अधिक व्यापक होऊ लागला, तर अमराठी भाषिकांना आपली भाषा हळूहळू अवगत होऊ लागेल. एके काळी महाजालाच्या अर्थात इंटरनेटच्या जाळ्यात मराठी हरवून बसेल असे वाटत असताना, मराठी भाषा महाजालावरही मात करून आपले स्थान बळकट करत आहे. महाजालावर मराठी अधिकाधिक पोहोचविण्यात मराठी तरुणाईने घेतलेला पुढाकार निश्चितच उत्साह वाढविणारा ठरत आहे.
मराठी भाषा अभिजात, सर्वमान्य होण्यासाठी दैनंदिन व्यवहार, शासकीय यंत्रणा, मातृभाषेतून शिक्षण याचा प्रसार व प्रचार झाला पाहिजे. भाषावार प्रांतरचनेमध्ये मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि बोलीभाषा म्हणून फार पूर्वीपासून ती प्रचलित आहे. मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा आधार आहे. अशा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातील अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. आपण सर्वांनी मराठी आचरणात आणली, तर मराठी भाषा अधिक व्यापक होईल.
बालमानसशास्त्र असे सांगते की, मातृभाषेतून दिलेले शिक्षण बालकांच्या जितके पचनी पडते, तितके ते इतर भाषांमधून दिले गेले, तर शक्य होत नाही. मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाने संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धनही शक्य आहे. मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाची मागणी केवळ मराठी भाषकांचीच नाही, तर भारतात सर्वदूर मातृभाषेचे पुरस्कर्ते या मागणीचे समर्थक आहेत. असेच धोरण देशभर राबविले जाण्याची गरज आहे. आज मराठीच्या दु:स्वासामुळे ‘या बाळांनो यारे या, लवकर भरभर सारे या’, ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाºया बैलांची जोडी हो,’ अथवा ‘झुक झुक झुक झुक आगीन गाडी’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ यांसारख्या अजरामर गीतांपासून आणि त्यातून संस्कृती, देश, देव, समाज, नाती, व्यवहार समजवून घेणारी कला नाश होऊ लागली आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजून मिळालेला नसला, तरी राज्य शासनाच्या शाळांना मराठी विषय अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे अनेक फायदे होणार आहेत. या विधेयकात विषयाची सक्ती टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरविण्यात आल्याने त्याला शैक्षणिक संस्थांकडून फारसा विरोध होणार नाही, असे प्रथमदर्शनी तरी दिसते. बोलीभाषेचे अस्तित्व त्या प्रवाहातील मुख्य भाषा जीवित असल्याचे प्रमाण मानले जाते. त्यामुळे न्यूनगंड न बाळगता, आपली भाषा जास्तीतजास्त बोलणे हे कोणत्याही भाषेच्या संवर्धनाचे पहिले पाऊल ठरते. मराठी भाषेच्या आगरी, कुणबी, मालवणी, नागपुरी, मांगेली अशा अनेक बोली आहेत. मराठीचे संवर्धन करायचे असेल, तर या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. मराठी माणूस नाटकवेडा असताना हिंदी चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या वाढतेय. तेव्हा स्वत:च्या मातृभूमीतील कलाकृती असलेल्या नाटक, सिनेमाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सहकुटुंब मराठी नाटक, चित्रपट पाहावयास हवे. मराठी भाषा, साहित्याला वाचविण्यासाठी वर्षाला निदान दोन-चार मराठी पुस्तके, दिवाळी अंक घेऊन वाचणे आवश्यक आहे. जोपर्यंत गावागावांमध्ये मराठी भाषा विविध बोलींमध्ये बोलली, लिहिली जाते, त्याद्वारे व्यवहार होतो, तोपर्यंत तिला भीती नाही. कोणत्याही भाषेचा दर्जा हा त्यातील साहित्यावर ठरत असतो.
संगणकापासून स्मार्टफोनपर्यंत विविध तांत्रिक बाबींमध्ये मराठीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होणे आवश्यक आहे. मराठीत जितके दर्जेदार साहित्य निर्माण होईल, तितकी ती समृद्ध होत जाईल. त्यासाठी वाचन चळवळ आणि साजेसे असे वाङ्मयीन वातावरण निर्माण करणे काळाची गरज आहे.
(लेखक मराठी भाषा अभ्यासक असून भाषा संवर्धन समितीचे सदस्य आहेत.)