Join us  

'एकटे सोमय्या नव्हे, भाजपाच्या २८ नेत्यांची प्रकरणं उघड करणार'; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:49 AM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या वादात आता संजय राऊत यांनी नवा बॉम्ब टाकला आहे.

मुंबई-

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या वादात आता संजय राऊत यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून किरीट सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर खळबळजनक आरोप करत आहेत. यासंदर्भातील ट्विट्सची मालिकाच त्यांनी सुरू केली आहे. याचाच पुढचा भाग म्हणून आज संजय राऊत यांनी युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपयांचा निधी मिळाला असल्याचा आरोप केला. यावेळी राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यासह भाजपाच्या २८ नेत्यांची प्रकरणं उघड करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. 

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपाचे ते २८ नेते कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यात लाखो रुपये आले होते. त्यामुळे सोमय्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. भाजपा भ्रष्टाचारविरोधी लढात कसं काम करतंय हे आता दिसून आलं आहे. त्यांच्याच हातात सगळी सूत्रं आहेत आणि हे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार का? ज्यांच्या तोंडाला शेणाचा वास येत आहे तेच लोक दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेणार का?, असा खरमरीत टोला संजय राऊत यांनी लगावला. 

"आता यांचा खेळ संपला आहे. रोज ही प्रकरणं बाहेर येणार आहेत. सुरुवात त्यांनी केली होती शेवट आम्ही करू. सोमय्यांचा हा भ्रष्टाचार तर फक्त हिमनगाचं एक टोक आहे. सोमय्यांचं हे एकट्याचं प्रकरण नाही. भाजपाच्या २८ नेत्यांचं प्रकरण आहे", असं संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे ते २८ नेते कोण याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

राऊतांचा ट्विटर 'बॉम्ब'सोमय्या विरुद्ध राऊत या वादात आज राऊतांनी पुन्हा एकदा सोमय्यांविरोधात नवा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असा नवा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. "किरीट का कमाल: ३. किरीट सोमय्या यांनी NSEL ची ५६०० कोटी शेअर्सच्या घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे चौकशीची मागणी केली. मोतीलाल ओसवाल कंपनीची याप्रकरणी ED ने चौकशी केली. स्वत: किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनी शिपायांच्या घरी गेले होते. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्याने मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्याच्या युवाक प्रतिष्ठानसाठी घेतले", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाकिरीट सोमय्या