चालकांनी नव्हे, तर पादचाऱ्यांनीही नियमांचे पालन करण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 10:28 AM2024-02-07T10:28:54+5:302024-02-07T10:29:57+5:30
सुरक्षित प्रवासासाठी सहपोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांचे आवाहन.
मुंबई : विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करताना केवळ चालकांनीच नव्हे, तर पादचाऱ्यांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन सह पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी केले. अंधेरीच्या श्री नागरदास धारसी भुता हायस्कूलच्या वतीने वाहतूक सुरक्षा जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिस उपायुक्त नितीन पवार, सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय बोराटे, योगेश तांदळे उपस्थित होते. यात संस्थेचे विश्वस्त भानुमती भुताजी, कमलेश भुताजी, देवांगी भुताजी, शुभेंदू भुताजी, मुख्याध्यापक सर्जेराव वैद्य, उपप्राचार्य उज्ज्वला गोन्साल्विस, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासह स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या.
सुधारित पायाभूत सुविधा रस्ते :
सुधारित पायाभूत सुविधा रस्ते सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावते. चांगले डिझाईन केलेले रस्ते, योग्य सिग्नल, कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा आणि सुस्थितीत असलेली वाहने सुरक्षित वातावरणासाठी योगदान देतात, असे कमलेश भुताजी यांनी सांगितले, तर विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा दूत बनावे, असे आवाहन शुभेंदु भुताजी यांनी केले. यावेळी रॅली, पथनाट्ये यांच्या माध्यमातून जानजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर राहावे :
कोणत्याही पुरुषाकडून कोणत्याही प्रकारचे असभ्य वर्तन झाल्यास ते सहन करू नये. अशा वेळी तत्काळ पोलिसांना किंवा निर्भया सेलला माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले. विद्यार्थ्यांनी नशा किंवा अमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे. कारण नशा शेवटी त्यांचा नाश करेल, अशा इशारा पोलिस उपायुक्त नितीन पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.