मुंबई - अंधेरी विधानसभेत २ लाख ७० हजार मतदार आहेत. याठिकाणी शिवसेनेचा गड आहे. मतदारसंघातील परप्रांतीय हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या पाठिशी आहेत. दबावामुळे शिवसेनेचं चिन्ह काढून घेतले. शिवसेना दहशतवादी पक्ष असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. परंतु महाराष्ट्रातील लोक जागरुक आहेत. लढाईत ते सहभागी झालेत. आज केवळ उद्धव ठाकरेंचा नव्हे तर मराठी माणूस आणि मुंबईकरांचा अपमान झालाय अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते कमलेश राय यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राय यांच्यावर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
कमलेश राय म्हणाले की, लोकांच्या मनात चीड आहे. जे चिन्ह असेल ते लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबतीने या निवडणुकीत २५-३० हजार मताधिक्याने निवडून येऊ. गोंधळ निर्माण करण्यासाठी चिन्ह गोठवण्यात आले आहे. परंतु त्याचा फायदा विरोधकांना होणार नाही. जे नवे चिन्ह आम्हाला मिळेल ते घरोघरी पोहचवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. याठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणारच असं त्यांनी म्हटलं.
तसेच अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा आहे. उद्धव ठाकरेंनी कोविड काळात परराज्यातील प्रवाशांना घरी पोहचवण्यासाठी कुटुंबप्रमुख म्हणून काम केले. ईद, रमजानसाठी मुस्लीम बांधवांना मदत केली ते लोक विसरले नाही. मराठी माणूस शिवसेनेच्या पाठिशी आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे. ६ तारखेला जो निकाल येईल त्याने भाजपाला धक्का बसेल. आम्ही लोकांच्या घरापर्यंत जात प्रचार करणार आहोत असं कमलेश राय यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्यात संविधानानुसार जे काही काम असेल ते आम्ही करतो. उद्धव ठाकरेंनी सर्वांची मदत केली आहे. युवकांना रोजगार हवा. महागाई नको. लोक त्रस्त झाले आहेत. हिंदुच्या नावाखाली लोकांना भडकवलं जात आहे. परंतु ते आता होणार नाही. ह्दयात राम आणि हाताला काम हे आमचं धोरण आहे. लोकांमध्ये जात आम्ही काम करणार आहोत असंही कमलेश राय यांनी सांगितले.