मुंबई - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या कारवाईचे पडसाद राज्यभरात सगळीकडू उमटू लागले आहे. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद आणि निदर्शने सुरु केली आहेत. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांवरील ईडी कारवाईविरोधात मोठं विधान केलं आहे. शरद पवार फक्त महाराष्ट्रातील देशातील महत्वाचे नेते. ज्या प्रकरणात शरद पवारांचे नाव नाही तरीही गुन्हा दाखल होत असेल तर त्याबाबत लोकांच्या मनात शंका उपस्थित होणं स्वाभाविकच आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे राष्ट्रवादीच्या विचारांचे नाहीत त्यांनाही हे कसं घडलं ? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती, तपास यंत्रणांचा गैरफायदा कोणीच घेतला नव्हता. हे देशासाठी आणि राजकारणासाठी घातक आहे. काँग्रेसच्या राजवटीतही टोकाचं राजकारण झालं नव्हतं. सरकार हे भाजपाचं आहे आमचं नाही. तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
यापूर्वीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात सुडबुद्धीचं राजकारण करणं ही आपली संस्कृती नाही असं सांगत अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली होती. तसेच अमित शहा यांनी पवारांनी 50 वर्षात महाराष्ट्रासाठी काय केलं या प्रश्नावर सामनातून भाष्य करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचं मोठं योगदान आहे हे विसरता येणार नाही असं उत्तर शिवसेनेने भाजपाला दिलं होतं. त्यामुळे एकंदर पाहता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे का? याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.
शिवसेना-भाजपा युतीबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची मॅरेथॉन बैठक दिल्लीत अमित शहांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात युती करण्यासाठी भाजपा सकारात्मक असली तरी जागावाटपात शिवसेनेला समसमान जागा देण्यासाठी भाजपाचे नेते तयार नाहीत. त्यामुळे जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका आली नाही. मात्र शरद पवारांवर झालेल्या ईडी कारवाईमुळे राज्यातील राजकारणात वेगळी कलाटणी मिळणार का हे पाहणं गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
देशातील लोकशाही संकटात; मुस्कटदाबी होणार असेल तर सहन करणार नाही - धनंजय मुंडे
विरोधीपक्षातील आमदारांचं कारकून सुद्धा ऐकत नाही; मनसेत असताना मी अनुभवलं - हर्षवर्धन जाधव
भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, UNमधील भाषणाआधीच इम्रान खान यांनी मानली हार!