Join us

हा राजकीय बंद नाही, जनतेने स्वेच्छेने बंदमध्ये सहभागी व्हावे - शिवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:06 AM

भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये स्वेच्छेने सहभागी होऊन जनतेने शेतकऱ्यांप्रति ...

भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये स्वेच्छेने सहभागी होऊन जनतेने शेतकऱ्यांप्रति असणारी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मंगळवारच्या भारत बंदमध्ये अनेक राजकीय पक्ष उतरले असले तरी हा कोणताही राजकीय बंद नाही, तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठीचा बंद असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला आहे. तर, डाव्या पक्षांसह जनता दल धर्मनिरपेक्ष, शिक्षक भारती अशा विविध संघटनांनी आपले समर्थन जाहीर करत ठिकठिकाणी निदर्शनांचे आयोजनही केले आहे. बंदबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, संकटकाळातही बळीराजा शेतात राबत असतो. कोरोनादरम्यान आपण घरी असताना शेतकरी शेतात काम करत होता. आज शेतकऱ्यांनी आपल्याला साद घातली असून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहिले पाहिजे. राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी नेहमीसारखा हा राजकीय मागण्यांसाठीचा बंद नाही, तर देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा यासाठीचा आहे. बारा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी स्वेच्छेने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत असल्याचे राऊत म्हणाले.

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला सक्रिय पाठिंबा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते मुंबईत आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस त्यांच्यासोबत राहणार असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच बंदला पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. तर, भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष असल्याची टीका नवाब मलिक यांनी आज केली. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद असून त्याला महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सामान्य लोकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.