Join us

रोबो नव्हे, एक कोटीचे खेळणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:58 AM

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इमारतीच्या तिसºया-चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी शिड्यांशिवाय पर्याय नव्हता.

मुंबई : आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचा जवान जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो जाऊन आग विझवेल, असे वाटत होते. मात्र अग्निशमन दलाचा हा दावा फोल ठरला आहे. एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेला रोबो इमारतीच्या पायऱ्या चढण्यातच नापास झाला. अग्निशमन दलाने कुठलीही चाचणी न घेता एक कोटी रुपयांचा रोबो आणला. हा रोबो नव्हे, एक कोटीचं खेळणं असल्याचा आरोप समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी केला.

अग्निशमन दलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या रोबोची चाचणी वांद्रे, एमटीएनएल इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी सोमवारी करण्यात आली. मात्र आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने मारलेले पाणी शिड्यांवरून वाहत होते. त्यामुळे रोबोला शिड्यांवरून चढताच आले नाही. याची कबुली पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दिली. एमटीएनएलच्या दहा मजली इमारतीच्या तिसºया व चौथ्या मजल्यावर सोमवारी भीषण आग लागली होती. या आगीतून स्वत:चा बचाव करण्यासाठी तब्बल शंभर कर्मचाऱ्यांनी गच्चीकडे धाव घेतली होती. त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे आव्हान अग्निशमन दलापुढे होते. अशावेळी गेल्याच आठवड्यात अग्निशमन दलात आणलेल्या रोबोला बचाव कार्यात उतरविण्यात आले.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इमारतीच्या तिसºया-चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी शिड्यांशिवाय पर्याय नव्हता. त्यातच पाण्याच्या बंबाने आग विझविताना मारा केलेले पाणी पुन्हा शिड्यांवरून खाली येत होते. पाणी खाली येत असल्याने रोबोला वर चढण्यात अडचणी येत होत्या, असे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी स्थायी समितीत स्पष्ट केले.

रोबो खरेदी करण्याआधी तो पाण्याचा मारा कसा करतो? किती वरपर्यंत जाऊ शकतो? याबाबत अग्निशमन दलाने माहिती घेणे गरजेचे होते. मात्र फुशारकी मारण्यासाठी अग्निशमन दलाने केलेला ही उठाठेव असून मुख्य अग्निशमन अधिकारी यांची रोबो खरेदीत चौकशी करावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य अभिजीत सामंत यांनी या वेळी केली.

टॅग्स :आग