एक रुपयाची कमाई नाही, मुलाबाळांची उपासमार होते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:13 PM2020-04-16T19:13:44+5:302020-04-16T19:14:13+5:30
रिक्षाचालकांची व्यथा
मुंबई : लॉकडाऊनमुळे रिक्षा बंद आहेत, त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रिक्षा बंद आहे, एक रुपयाची कमाई नाही, मुलाबाळांची उपासमार होते अशी व्यथा रिक्षाचालकांनी मांडली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्याचा रोजगारावर परीणाम झाला आहे. अप आधारित रिक्षामुळे इतर रिक्षा चालकांना कमी प्रवासी मिळत होते. लॉकडाऊनमध्ये सरकारने प्रवासी वाहतुकीवर काही निर्बंध लादले आहे. रिक्षातून एक आणि टॅक्सीत दोन प्रवासी जाऊ शकणार आहेत.
रिक्षा चालक सिद्धार्थ जाधव म्हणाले की, गेल्या एक ते दीड महिन्यापासून घरी आहे. रिक्षावर आमचे घर चालते पण ती बंद आहे.खुप गंभीर परिस्थिती आहे. घरखर्चासाठी रिक्षा बाहेर काढली तर पोलीस कारवाई करतात. रिक्षा हत्यावर घेतलेली आहे तर हप्त्यासाठी बँकेचे मेसेज येत आहेत. आता एक रुपयाची कमाई नाही, मुलांची उपासमार होते बँकेचे हप्ते भरायला पैसे कोठून आणायचे असा प्रश्न आहे. रिक्षाचालक दिवस रात्र प्रवाशांना सेवा देतात पण आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे तर कोणी लक्ष देत नाही.
संतोष धांडगे म्हणाले की, सध्या रिक्षा बंद आहे, रेशनकार्डवर जे राशन भेटते त्यावरच घर चालवावे लागले.लॉकडाऊनमध्ये बिकट जीवन जगावे लागत आहे. त्यातच बँकांच्या हप्त्याचे टेन्शनही आहे. तर दिल्ली सरकारने तेथील रिक्षा चालकांना आर्थिक मदत केली आहे. आज महाराष्ट्रातही रिक्षाचालक हलाखीचे जीवन जगत असून राज्य सरकारने रिक्षा चालकांना किमान पाच हजारांची आर्थिक मदत करावी अशी मागणी रिक्षाचालक रईस अन्सारी यांनी केली आहे.